Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Pune › पुणेकरांचा २६ टन मासळी, ५०० टन मटणावर ताव

पुणेकरांचा २६ टन मासळी, ५०० टन मटणावर ताव

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी

आषाढातील शेवटचा रविवार असल्याने मासळी, मटण तसेच चिकन खरेदीसाठी रविवारी सकाळपासून खवय्यांनी गर्दी केल्याचे चित्र शहरात दिसून आले. आषाढातील अखेरचा आठवडा असल्याने मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक-जावक कायम असल्याने मासळी वगळता सर्व भाव स्थिर राहिले. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने मासळीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, रविवारी पुणेकरांनी तब्बल 26 टन मासळी, सुमारे 500 टन चिकन आणि तितकेच मटण फस्त केल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

सामिष खवय्यांकडून आषाढ महिन्यात मटण, मासळी आणि चिकनला मोठी मागणी असते, कारण सामिष खवय्ये श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य करतात. त्यामुळे रविवारी गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठ, भवानी पेठ, गंज पेठेतील मासळी बाजारात तसेच उपनगरातील विश्रांतवाडी, कोथरूडमधील पौड फाटा येथील मासळी बाजार गजबजल्याचे दिसून आले. रविवारी (दि. 5) आषाढातील शेवटचा रविवार आहे. पुढच्या रविवारी (दि. 12 ऑगस्ट) रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करत नाहीत. त्यानंतर गणेशोत्सव असतो. गणेशोत्सवातही मांसाहार केला जात नाही. कित्येक जण दिवाळीपर्यंत मांसाहार करण्याचे टाळतात. या पार्श्‍वभूमीवर आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी मांसाहाराचा बेत आखल्याचे दिसून आले. सुट्टीचा फायदा घेत पुणेकरांनी हॉटेलमध्ये जाऊन, तर काहींनी ग्रुपमधील लोकांसह पार्ट्या करण्यास पसंती दिली. 

दरम्यान, नेहमीच्या रविवारच्या तुलनेत चिकनची आज तब्बल 40 टक्के जास्त विक्री झाल्याचे सांगून व्यापारी रूपेश परदेशी म्हणाले, पुणे जिल्हा परिसरात मोठ्या पोल्ट्री व्यावसायिकांकडून कोंबडी बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. बाजारात जिवंत पक्ष्यांची आवक केली जाते. घरगुती, हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांकडून चिकनला मोठी मागणी होती. रविवारी शहरात तब्बल 450 ते 500 टन चिकनची विक्री झाली. त्या तुलनेत आवकही चांगली झाली. त्यामुळे आवक आणि मागणी यातील समतोलामुळे भाव स्थिर होते. तर मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, आषाढातील शेवटच्या रविवारच्या तुलनेत अपेक्षित मटणाला मागणी नव्हती. मात्र, नेहमीच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त मागणी होती. विशेषत: हॉटेल व्यावसायिकांकडून मटणाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.  

यासंदर्भात गणेश पेठ मासळी बाजारातील प्रमुख विक्रेते ठाकूर परदेशी म्हणाले, मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील चौदा टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलन या मासळीची बारा टन, नदीतील मासळी दोन ते अडीच टन, खाडीतील मासळी 200 ते 300 किलो, अशी आवक झाली. मासळीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, शहरात रविवारी तब्बल 26 टन मासळीची विक्री झाली. मागील तीन-चार दिवसांपासून मासळीला मागणी जास्त आहे.