Wed, Apr 24, 2019 21:58होमपेज › Pune › गाईने दिला फक्त वासराच्या तोंडाला जन्म

गाईने दिला फक्त वासराच्या तोंडाला जन्म

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:49AM

बुकमार्क करा

भिगवण : भरत मल्लाव

या जगात काय आणि कधी आश्‍चर्यचकत घटना घडतील याचा नेम नाही... भिगवणजवळील कुंभारगाव येथेही अशीच अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्‍वसनीय व तेवढीच दुर्मिळ घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी घडली आहे. एका गाईने एका वासराला जन्म दिल्यानंतर दुसर्‍या वासराच्या शरीराच्या संपूर्ण अवयवांऐवजी केवळ तोंडाचाच भाग जन्माला आला आहे. जन्मानंतर सुरुवातीला जिवंत असलेले हे तोंड  अल्पावधीत  मृत झाले आहे. ही बाब आश्‍चर्यकारक असली तरी त्याला शास्त्रीय कारणे आहेत. अशा घटना गुणसूत्रातील आनुवंशिक दोषांमुळे घडत असल्याचे मत पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी या घटनेबाबत बोलताना व्यक्त केले आहे.

भिगवणजवळील धुमाळवाडी (कुंभारगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) येथील चंदुलाल बाबूराव धुमाळ या शेतकर्‍याच्या घरी ही घटना घडली आहे. धुमाळ यांच्याकडे शेतीबरोबरच नऊ गाई व शेळ्या अशी पळीव जनावरे आहेत. यापैकी  शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक गाय व्यायली. पहिल्यांदा त्या गाईला जर्शी वासरू जन्माला आले. मात्र त्यानंतर अल्पावधीतच केवळ तोंड असलेले दुसरे वासरू जन्माला आले.

सुरुवातीला या गाईला बहुतेक दुसरे वासरू होत असावे असे वाटले होते. मात्र, वासराचे संपूर्ण शरीर बाहेर पडण्याऐवजी केवळ तोंड असलेलेच वासरू तेही जिवंत जन्माला आलेे. या तोंडाला डोळे व जबड्याचा भाग  विकसित झालेला आहे. या प्रकारामुळे खुद्द धुमाळही आश्‍चर्यचकित झाले. त्यानंतर ही घटना त्यांनी संबंधित कुटुंब व परिवाराला सांगितली. मात्र जन्मतःच जिवंत असलेले तोंड अल्पावधीत मृत झाले आहे. त्यानंतर धुमाळ यांनी हे तोंड पुरून टाकले.  

याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी एस. ए. भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गुणसूत्रातील आनुवंशिक दोषामुळे अशा घटना घडल्याची नोंद आहे. अशा गुणसूत्रातील दोषांमुळे काही वेळा केवळ पाय जन्माला येणे किंवा तीन पाय असणे, डोळा नसणेे, कानच नसणे अशी विकृत वासरे जन्माला येतात, असे डॉक्टर भारती म्हणाले. असे असले तरी केवळ तोंडच जन्माला आल्याने हा कुतूहलाचा विषय बनला आहे.