होमपेज › Pune › गाईचे दूध चार रुपयांनी स्वस्त

गाईचे दूध चार रुपयांनी स्वस्त

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी         

राज्यातील 21 खासगी दूध उद्योजकांनी एकत्र येऊन, गाईच्या दुधाच्या विक्री दरात लिटरमागे 4 रुपयांची कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी बारामतीतील बैठकीत घेतला. त्यामुळे सध्या 42 रुपये असणारा विक्री दर लिटरला 38 रुपये तर 40 रुपये दर 36 रुपये होईल.  या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 16 जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा दुधाचे  अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी रात्री उशिरा ‘पुढारी’ला दिली.

मागील दोन  महिन्यांहून अधिक दिवस  गाईच्या दुधाचे खरेदीचे दर शासनाने लिटरला 27 रुपये निश्चित केले. मात्र, दूध पावडरचे भाव  जागतिक  बाजारासह देशांतर्गत बाजारात घटल्याचे कारण पुढे करीत, दूध खरेदी दर 17 ते 18 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने नाराजी पसरली होती, तर दुसरीकडे विक्रीचा दर मात्र 40 ते 42 रुपये ठेवल्याने जादा दराने दूध खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली होती.

या विषयाला ‘पुढारी’ने सातत्याने वाचा फोडली होती. शेतकर्‍यांना कमी दर देऊन ग्राहकांना चढ्या दराने दूध विक्री करण्याच्या विषयावर सहकारी संघ आणि खासगी दूध व्यवसायिकांचे तोंडावर बोट ठेवल्याचेही स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर खासगी दूध व्यावसायिकांनी दूध विक्री दरात कपात करून ग्राहकांना किंचित दिलासा दिला आहे. खासगी दूध व्यावसायिकांच्या या निर्णयाचा परिणाम सहकारी संघाकडून गाईच्या दूध विक्री दरात कपात कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.