Tue, Apr 23, 2019 22:34होमपेज › Pune › एकबोटेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

एकबोटेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी 

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 18 नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही; त्यामुळे कोरेगाव-भीमा प्रकरणातील समस्त हिंदू आघाडीचे  कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुर यांच्या न्यायालयाने फेटाळला.

शिव जागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात एका महिलेनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमांनुसार फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी या त्यांच्या नातेवाईक मुलांसह दि. 1 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी चालले होते. त्या दिवशी त्यांनी शिक्रापूर टोलनाका पास केल्यानंतर त्यांना सणसवाडी येथे दगडफेक, जाळपोळ सुरू असल्याचे दिसले.

त्या वेळी जमावामध्ये नागरिकांकडे हत्यारे असल्याचे पाहिल्याचे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. नागरिक लोखंडी रॉड, तलवारी घेऊन फिरत असताना त्यांना दिसले. तसेच गाड्यांची तोडफोड होताना दिसली. ही सर्व घटना संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी घडवून आणली असल्याचे व डोळ्यांनी पाहिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी, खुनाचा प्रयत्न, तोडफोड, बेकायदेशीर जमाव प्रकरणी गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल होऊन गुन्हा शिक्रापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

या प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे गुन्हा केला नाही. परिस्थितीजन्य स्थितीनुसार यामध्ये माझ्याविरुध्द कोणताही गुन्हा निष्पन्न होत नसल्याचे एकबोटे यांनी अर्जात नमूद केले होते. मी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख म्हणून सामाजिक काम करत आहे. तसेच उच्चशिक्षित असून, गेल्या दहा वर्षांपासून पालिका निवडणूक लढवीत असल्याचे नमूद करताना या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे म्हणत अटकपूर्व जामीन देण्याची मागणी केली होती; परंतु अ‍ॅट्रॉसिटीच्या कलम 18 नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नसल्याने सरकारी पक्षाने युक्‍तिवाद मांडण्यापूर्वीच जामीन फेटाळला.