होमपेज › Pune › दाम्पत्यांमधील दुरावा वाढतोय

दाम्पत्यांमधील दुरावा वाढतोय

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:34AMपुणे :महेंद्र कांबळे 

दिवसेंदिवस एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत असतानाचा संसाराची घडी सैल होत चालली असल्याचे चित्र चिंता वाढवत आहे. सध्या सोशल नेटवर्किंग साईटचा वाढता वापर, मोबाईल आणि एकमेकांकडून वाढत्या अपेक्षांमुळे दाम्पत्यात दुरावा वाढत असल्याचे कौटुंबिक न्यायालयात दाखल होणार्‍या दाव्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. पाच वर्षात तब्बल 21 हजार 642 दावे दाखल झाले असून याची सरासरी पाहिल्यास दिवसाला 12 नवीन कौटुंबिक कलहाची प्रकरणे दाखल झालेली आहेत.  एकत्र कुटुंब पध्दतीमुळे वडीलधारी मंडळी वेळीच योग्य मार्गदर्शन करून पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाणार नाही यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे घटस्फोटासाठी कौटुंबीक न्यायालयात दाखल होणार्‍या दाव्यांचेही प्रमाण नगण्य होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीमुळे  आता परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला आहे.  पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत विभक्त कुटुंब पध्दत रुढ झाली आहे.

त्यामुळे किरकोळ कारणावरून निर्माण झालेले भांडण थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. करिअरमागे धावणार्‍या पिढीला नातेसंबंध गौण वाटू लागले आहेत. त्यात प्रतिष्ठा, उशिरा झालेला विवाह, ऐष-आरामाच्या वस्तू नसणे अथवा खरेदीपासून मज्जाव करणे, संपत्तीचा हव्यास, एकमेकास पुरेसा वेळ न देऊ शकणे, अशा कारणांमुळे दाम्पत्यात बेबनाव वाढत आहेत.  सोशल मीडियाचा  वापर, आर्थिक अस्थिरता,  अवास्तव अपेक्षा, पालकांची संसारातील ढवळाढवळ, अनैतिक संबंध, इगो-प्रॉब्लेम अशा कारणांमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

अगदी किरकोळ कारणावरून दोघांत वाद होत आहेत. कपडे कुणी धुवायचे, आवडीची भाजी केली नाही, आवडीचा ड्रेस घातला नाही, फिरायला नेले नाही, मोबाईल मध्ये व्यस्त असणे, टीव्ही पाहणे, मित्र -मैत्रिणींशी चॅटिंग करणे यासारख्या क्षुल्लक गोष्टींपासून झालेली भांडणेही थेट कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. काही प्रकरणात तर पालकच मुलांना घटस्फोट घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे दिसून येत आहे. तिला स्वयंपाक येत नाही, घरच्यांनी काही शिकवले का नाही ? अशा पध्दतीने वारंवार टोमणे मारून पालक सुनेला त्रस्त करतात.  यातूनच ती काही उलट बोलली की, मुलाचे कान भरले जातात; यातून दाम्पत्यामध्ये वाद होता.

अशाच पध्दतीने मुलाच्या गैर हजेरीत वयोवृध्द सासू-सासर्‍यांना सुनांकडून वाईट वागणूक दिली जाते. आई-वडील त्रास देतात हे तिखट मीट लावून सांगून पतीला सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या मनात आई वडीलांविषयी चिड निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आई-वडीलांना वृद्धापकाळाला कोणताही आधार नसल्याने  उपजीवेकेसाठी पोटगी मिळावी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्या शिवाय पर्याय उरत नाही. घटस्फोट, आई-वडिलांना पोटगी, विवाहितेला पोटगी, मुलाचा ताबा अशा विविध मागण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केले जातात. यामुळे कौटुंबिक न्यायालयात दाखल होणार्‍या दाव्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.   

सामाजिक परिस्थिती बदलत चालल्याने नाती हाताळताना एखादा मुद्दा वादाचे कारण ठरत आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात धाव घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. पीडित म्हणून केवळ पत्नीच न्यायालयात धाव घेत आहे, अशी परिस्थिती नसून पती असलेल्या पक्षकारांचे देखील प्रमाण मोठे आहे. पती-पत्नी दोन्ही बाजूंनी क्षुल्‍लक कारणासाठी  वेठीस धरण्याचे (उदा. मुलांना भेटू न देणे) प्रकार वाढले आहेत. भांडणाच्या प्राथमिक स्तरावरच वडीलधार्‍यांनी किंवा समुपदेशकाच्या साहाय्याने वाद शांत करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे दररोज दाखल होणार्‍या दाव्यांचे प्रमाण कमी होण्यास काही अंशी मदत होईल.

 -अ‍ॅड. गणेश कवडे, अध्यक्ष,  पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे.