Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Pune › शहरातील बांधकाम परवाना माहितीचा खर्च एक कोटी !

शहरातील बांधकाम परवाना माहितीचा खर्च एक कोटी !

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 1:33AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकामांना बांधकाम परवाना कोणत्या नियमानुसार दिला जातो, आतापर्यंत शहरातील किती आणि कोणत्या बांधकामांना बांधकाम परवानगी दिली आहे याची माहिती भरमसाट असून, ती गोळा करण्यासाठी तब्बल 1 कोटी खर्च येणार आहे, असे अजब उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांना दिले आहे. 

नगरसेविका बारणे यांनी शहरातील बांधकाम परवानगी वाटपासंदर्भातील 7 प्रश्‍न पालिका सर्वसाधारण सभेत समाविष्ट करण्याबाबचे पत्र 8 ऑगस्टला महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते. पालिका स्थापनेपासून आतापर्यंत शहरातील बांधकाम परवानगी विभागामार्फत देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी प्रकरणाची यादी (बांधकाम व्यवसायिकाचे नाव, बांधकाम परवानगी दिलेल्या प्रकरणाचा पत्ता) देण्यात यावा. 

बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगीची नियमावली पालिकेने की राज्य शासनाने तयार केली आहे, बांधकाम परवानगी दिलेल्या किती बांधकाम व्यावसायिकांना पूर्णत्वाचा दाखल देण्यात आला आहे, किती बांधकाम व्यावसायिकांनी पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही, अशा व्यावसायिकांवर पालिकेने काय कारवाई केली, पूररेषा अस्तित्वात येण्यापूर्वी जी बांधकाम प्रकरणे चालू होती त्या प्रकरणावर पूररेषा अस्तित्वात आल्यानंतर काय कारवाई करण्यात आली याची यादी द्यावी. पूर्णत्वाचा दाखला देताना कोणत्या निकषाची पाहणी केली जाते व कोणकोणते दाखले घेण्यात येतात, आदी प्रश्‍न त्यांनी दिले होते. 

सदर प्रश्‍न महिना उलटूनही सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर न आल्याने नगरसेवक बारणे यांनी आयुक्त हर्डीकर यांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतली. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, ही संपूर्ण माहिती खूप जास्त आहे. ती गोळा करण्यासाठी सुमारे 1 कोटी रूपये खर्च येईल. आपल्या प्रश्‍नांबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली जाईल. असे अजब उत्तर आयुक्तांनी दिल्याचे नगरसेविका बारणे यांनी शुक्रवारी (दि.7) पत्रकार परिषदेत सांगितले. सदर माहिती  अधिकार कायद्याखाली मागवलेली नाही. सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर प्रश्‍नोत्तरे घेण्यासाठी सदर पत्र दिले आहे. मात्र, आयुक्त सदर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात महापौर जाधव यांनी कशाला कुटाणा करता, असा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. तर, संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे उत्तर पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. 

पालिका अधिकार्‍यांच्या मनमानी कारभार उघड करण्यासाठी सदर प्रश्‍न उपस्थित केल्याचे सांगून, ती माहिती न दिल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेविका बारणे यांनी दिला आहे.