Sun, May 26, 2019 10:35होमपेज › Pune › ठेकेदारांच्या बसेसला महामंडळाचा दणका

ठेकेदारांच्या बसेसला महामंडळाचा दणका

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

शहरात सलग तीन दिवस पडणार्‍या संततधार पावसामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) आणि ठेकेदारांच्या ताब्यातील बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध मार्गांवर दिवसाला सरासरी 140 बसेस बंद पडत आहेत. त्यामध्ये पीएमपीएमएल मालकीच्या 8 टक्के  तर, ठेकेदारांच्या 10 टक्के बसेस बंद पडल्या आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी बस बंद पडत असल्याने संबंधित ठेकेदारांना दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिली आहे. 

पीएमपीएमएल महामंडळातील आणि भाडेतत्त्वावरील काही बसेस रस्त्यांवर बंद पडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विविध मार्गावर  140 पेक्षा जास्त बस बंद पडल्यामुळे अनेकांना घरी पोहोचण्यास उशीर झाला होता. बंद पडणार्‍या बसेसमध्ये  ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बसेसचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण 10 टक्यांनी वाढले आहे. त्यामुळे अनेक फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की आली आहे. महामंडळाने  ठेकेदारांकडून 653 बसेस भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. त्यांपैकी सध्या 450 बस मार्गावर धावत आहेत. दोन दिवसांत ठेकेदारांच्या 90 पेक्षा जास्त बस मार्गावर बंद पडल्या होत्या. तर बुधवारी देखील 90 बसेस मार्गावर बंद पडल्या होत्या. काही बस मार्गावर बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. ही परिस्थिती समोर आल्यानंतर याची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. यासंदर्भात बुधवारी गुंडे यांनी पीएमपीच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बसेसची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने अनेक बस मार्गावर बंद पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांची गैरसोय झाल्याने प्रशासनाकडून ठेकेदारांना दंड आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अहवालास ठेकेदारांकडून कात्रजचा घाट

खासगी भाडेतत्त्वावरील असणार्‍या एका बसचा वारजे पुलाजवळ अपघात झाला होता. ही बस खासगी भाडेतत्त्वावरील होती.  त्यानंतर ठेकेदारांच्या सर्व बसेसची तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश  पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिले होते.  ठेकेदारांनी बसेसचा अहवाल 10 जुलैपर्यंत देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ठेकेदारांकडून तपासणी अहवाल सादर करण्यास कात्रजचा घाट घालण्यात आला आहे.