Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Pune › शहरातील खाकीचा वचकच हरवला

शहरातील खाकीचा वचकच हरवला

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:40AMपुणे : विजय मोरे

गत दोन वर्षात शहर पोलिस दलातील खाकी वर्दीने, चौकाचौकात खाल्लेला मार, सुमारे सव्वादोनशेवर पडलेले मुडदे, पन्नासपेक्षा अधिक पुणेकरांवर पडलेले दरोडे, दहा हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या घरावर चोरट्यांनी मारलेला डल्ला ही गुन्ह्यांची जंत्री बघून सर्वसामान्य पुणेकराला भोवळ आली नाही तर नवल! पण ....खाकी वर्दीवर वचकच नसलेले अतिवरीष्ठ आणि भ्रष्टाळलेली पोलिस यंत्रणा यामुळे शहर पोलिस दलातील ‘खाकी’चा वचकच राहिला नसल्याने या भोंगळ कारभाराला वठणीवर आणण्यासाठी गृहमंत्री, अर्थात दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनाच एखाद्या ‘खमक्या’ कॅप्टनची नेमणूक करावी लागेल, एवढे मात्र नक्की. 

गेल्या दोन वर्षात पुणे शहर पोलिस दलाचा कारभार अक्षरश: ‘राम भरोसे’ चालला आहे. सुमार क्षमता आणि दर्जाचे अतिवरिष्ठ असल्याने पोलिस दलात ‘बजबजपूरी’ झाली आहे. यासंदर्भात एका वरिष्ठ पोलिस सुत्राने याचा लेखाजोखा देताना सांगितले की, मुळात ‘जसा राजा तशी प्रजा’ हे एक वास्तव सत्य आहे.  या दोन वर्षात शहरात सव्वा दोनशेवर अधिक मुडदे पडले आहेत. दरोडेखोरांनी तर पन्‍नासच्या वर दरोडे घातले आहेत. भुरट्या आणि घरफोड्यांनी संपूर्ण शहर आणि उपनगरात धुमाकूळ घालत 13 हजार घरात चोर्‍या झाल्या आहेत.  सांस्कृतिक म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यासारख्या शहरात 700 पेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे घडलेले आहेत. तर सव्वा सहा हजार सर्वसामान्य पुणेकरांच्या मोटारसायकल आणि कारसुद्धा चोरीस गेल्या आहेत. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना या सुत्राने सांगितले की, शहराला गुन्हेगारीने विळखा घातला असतानाच जुगार, मटका, आणि चरस, गांजा, ब्राऊन शुगरचे धंदे प्रत्येक चौकात राजरोसपणे सुरू आहेत. फक्त दोन वर्षात या सगळ्या प्रकारांमध्ये तब्बल 28 हजार गुन्हे पोलिसांत दाखल झाले आहेत. यात पोलिस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांनी ‘बर्किंग’ (गुन्हा दाखलच न करणे) केलेल्या गुन्ह्यांची भर टाकली तर हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. शहरात हाय प्रोफाईल वेश्यांचा बाजार आता उंची फ्लॅट आणि डुप्लेक्समध्ये मांडला गेला आहे. हिंजवडी, कोरेगाव पार्क विमाननगर, पिंपरी, पिंपळे सौदागर आणि वाकड परिसरातील या हायप्रोफाईल वेश्यांनी उच्छाद मांडला आहे. तर शहरात टोळीयुद्धाने शहरवासीयांची झोप उडविली आहे. समाजकंटकांनी सर्वसामन्यांच्या गाड्या जाळून पुणेकरांना दहशतीच्या सावटाखाली ढकलले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची एकुणच कामगिरी पुर्णत: फिकी पडली आहे. 

या सर्व बजबजपुरीला अर्थातच अतिवरिष्ठ जबाबदार असल्याचे पोलिस दलात चर्चिले जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झपाट्याने विस्तारित होत आहेत. दोन्ही शहरांची लोकसंख्या सुमारे 50 लाखांवर गेली आहे. अशा परिस्थितीत या शहरांवर वचक ठेवण्यासाठी ‘खमक्या’ आणि अनुभवी वरिष्ठ अधिकार्‍याची खर्‍या अर्थाने गरज होती; मात्र ज्यांची पोलिस दलातील निम्मी कारकिर्द साईड ब्रांचला गेली आहे, ज्यांना पोलिस प्रशासनातील ‘खमक्या’ कामाचा अनुभव नाही अशा अतिवरिष्ठांकडे या शहराची सुत्रे गेल्यानेच शहर पोलिस दलाचा पार विचका झाला आहे, असे काही वरिष्ठ अधिकारी खासगीत कबुल करतात.

सुमार क्षमता व दर्जा असलेल्या अतिवरिष्ठांमुळे शहर पोलिस दलात खाबुगिरीने कळस गाठला आहे. अवैध धंद्यांना या भ्रष्ट अधिकार्‍यांचे अभय असल्याने त्यांना अवैध धंदे करण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे. हाय प्रोफाईल वेश्यांकडे गेलेल्या हाय प्रोफाईल गिर्‍हाईकांकडून 25 लाख रुपये धमकावून उकळले जात आहेत. तर प्रत्येक ठाण्यांच्या हद्दीत मिळणारी ‘मंथली’चे आकडे ‘अर्ध्या खोक्या’पर्यंत गेले आहेत. विशेष म्हणजे पैशांच्या जोरावरच ‘खाकी’ विकत घेतली जाऊ लागल्याने त्यांचा गुन्हेगारांवर वचकच राहिलेला नाही. चौकाचौकात ‘खाकी’वर सर्वसामान्यही हात टाकण्याची हिंमत करत असतील तर याला काय म्हणायचे? या भ्रष्टाचारी कारभाराने प्रामाणिक पोलिस अधिकार्‍यांची मात्र, गळचेपी झाली आहे. हे वास्तव नाकारता येत नाही, असेही त्या सुत्राने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, पुण्याला आता नवीन कॅप्टनचे वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत या ढेपाळलेल्या कारभाराला नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान नव्या कॅप्टनपुढे असणार आहे. अर्थात शहर पोलिस दलातील एकुणच झालेली दलदल साफ करण्यासाठी, अनुभवी आणि ‘खमक्या’ कॅप्टनचीच खर्‍या अर्थाने गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: यामध्ये गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे, अन्यथा शहर पोलिस दलाची अवस्था पूर्वाश्रमीच्या यु. पी., बिहार पोलिसअधिकार्‍यांसारखी होण्याची भितीही या सुत्राने व्यक्त  केली.

 

Tags : pune, pune news, Pune city police force, control,