Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Pune › शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प

शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:10AMपुणे : पांडुरंग सांडभोर

शहरातील बांधकाम परवानगीसाठी संरक्षण विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी  भारतीय सर्वेक्षण विभागाकडून भौगोलिक उंचीचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, या विभागाने 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव दाखल करून घेणेच बंद केल्याने, आता शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आली आहे. 

शहराच्या हद्दीतील लोहगाव आणि एनडीए या लष्कराच्या दोन विमानतळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरातील बांधकामांबाबत असलेले निर्बंध, संरक्षण विभागाने आता आणखीनच कडक केले आहेत. या दोन्ही विमानतळांच्या 6 कि.मी.च्या ‘रेड झोन’मध्ये, तसेच विमानांच्या ‘टेकऑफ’ आणि ‘लॅन्डिग’चा निळ्या रंगाचा 18 कि.मी.पर्यंतचा ‘फनेल’ झोन आणि शहरातील 627 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या प्रत्येक बांधकामासाठी संरक्षण विभागाची एनओसी बंधनकारक करण्यात आली आहे. या एनओसीशिवाय संबंधित बांधकामाला महापालिकेने परवानगी देऊ नये, असे आदेशच संरक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. या एनओसीसाठी संरक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यापूर्वी भारतीय सर्वेक्षण विभागाकडून बांधकामासाठी समुद्र सपाटीपासूनची भौगोलिक उंची तपासून घेऊन त्यासंबंधीचे प्रमाणपत्र जोडणेही बंधनकारक केले आहे.

संरक्षण विभागाच्या या नव्या निर्बंधानंतर भारतीय सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे गेल्या महिन्या-दीड महिन्यात प्रस्तावांची रिघच लागली आहे. त्यातच तुटपुंजा कर्मचारी वर्ग असल्याने, या कार्यालयावर ताण आला आहे. आता पुढील दोन महिने म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत नवीन प्रस्ताव दाखल करून घेणेच त्यांनी बंद केले आहे. तशी नोटीसच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी हवी असलेल्या नागरिकांची अडचण झाली आहे. 

या विभागाकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्याचा थेट परिणाम आता महापालिकेच्या बांधकाम परवानगीवर झाला आहे. प्रामुख्याने झोन 1 व 4 मधील बांधकाम परवानगीचे प्रस्ताव कमी झाले असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात हे काम पूर्णपणे थांबण्याची भीतीही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

एनओसीचा फटका बसलेले प्रमुख परिसर

लोहगाव, धानोरी, विमाननगर, विश्रांतवाडी, कळस, कल्याणीनगर, खराडी, चंदननगर, कोरेगाव पार्कचा परिसर, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, धायरीचा परिसर, औंध, बाणेरचा काही भाग, तसेच याव्यतिरिक्‍त शहरातील 627 मीटरपेक्षा अधिक उंचीचे प्रस्तावित प्रत्येक बांधकाम.