Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Pune › पोलिसांकडून ५८ लाखांचा मुद्देमाल सुपूर्द

पोलिसांकडून ५८ लाखांचा मुद्देमाल सुपूर्द

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

पुणेकरांनी आमच्यावर विश्‍वास ठेवला आहे. हा विश्‍वास असाच  राहिल्यास व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य असेच केल्यास पुणे पोलिसांची गणना राज्यातीलच नव्हे तर देशातील क्रमांक एकचे पोलिस म्हणून केली जाईल असे उद‍्गार पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी काढले. सोनसाखळी चोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना प्रदान करण्यासाठी शिवाजीनगर मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल पुन:प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी 48 फिर्यादींना त्यांचे सोन्याचे 1 किलो 836 ग्रॅम तर चांदीचे 1016 ग्रॅम चांदीचे दागिने असा 58 लाख 45 हजार 247 रुपये किंमतीचा मुद्देमाल रश्मी शुक्‍ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी सह पोलिस आयुक्त रविंद्र कदम, अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, रविंद्र सेनगावकर, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, संजय बाविस्कर, सुधीर हिरेमठ, ज्योतिप्रियासिंह, गणेश मोरे, दीपक साकोरे, प्रविण मुंढे, सहायक आयुक्त समीर शेख तसेच इतर अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

शुक्‍ला म्हणाल्या, मागील   वर्षात पुणेकरांना 5 कोटी रुपये किंमतीचे 10 किलो दागिने पुणे पोलिसांनी प्रदान केले आहेत. तर आणखी जप्त केलेला मुद्देमाल लोकांना परत करायचा आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तो राहिला आहे.आम्ही सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्हे उघडकीस आणून 70 टक्के मुद्देमाल पुन:प्रदान केला आहे. यात घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल काही वेळा पूर्णपपणे मिळत नाही. यासाठी पुणे पोलिस दलातील सह आयुक्तांपासून अगदी पोलिस शिपायापर्यंत सर्वजण आपलं काम करतात. अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. 
  
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत माझे सराफी दुकान आहे.  मागील महिन्यात नेपाळी तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून माझ्या दुकानातून दागिने लंपास केले होते. मात्र पोलिसांनी केवळ 24 तासाच्या आत आपले कौशल्य पणास लावून या दरोडेखोरांना वापी येथून अटक केली. माझा मुद्देमाल परत मिळाला याचा मला आनंद आहे. पुणे पोलिसांचा मी आभारी आहे, अशी भावना यावेळी लॉईड फेरो यांनी व्यक्त केली. 

माझ्या दुकानातील केवळ पैसे चोरीला गेले असल्याचे आमच्या लक्षात आले होते. मात्र खडक पोलिसांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून चोराला अटक केली. त्याने माझ्या वडिलांची सोन्याची साखळी दुकानातून चोरली होती. या साखळीशी माझ्या आईच्या भावना निगडीत आहेत. ती देखील परत मिळाली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, अशी भावना लक्ष्मीनारायण चिवड्याचे उत्पादक प्रशांत डाटा यांनी व्यक्त केली. 

आतापर्यंत प्रदान केलेला मुद्देमाल 

वर्ष 2017 : 2 मे 2017  : 3 किलो 425 ग्रॅम सोन्याचे तर 3 किलो 625 ग्रॅम चांदीचे दागिने,  28 जुलै 2017 : 72 जणांना 1 किलो 754 ग्रॅम सोन्याचे, तर 2230 ग्रॅम चांदीचे असे 45 लाख रुपयांचे दागिने,10 ऑक्टोबर 2017  : 74 जणांना 5 किलो 755 ग्रॅम सोने, 780 ग्रॅम चांदीचे असे 1 कोटी 81 लाखांचे दागिने  वर्ष 2018 :12 जानेवारी : 73 जणांना 3 किलो 563 ग्रॅम सोने व 726 ग्रॅम चांदीचे असे 1 कोटी 1 लाख रुपयांचे दागिने, 15 मार्च : 48 जणांना 1 किलो 836 ग्रॅम सोन्याचे तर 1016 ग्रॅम चांदीचे असे 58 लाख 45हजार रुपये किंमतीचे दागिने