Sun, Apr 21, 2019 06:16होमपेज › Pune › झोपडीधारकांची अवस्था ‘न घर का ना घाट का’

झोपडीधारकांची अवस्था ‘न घर का ना घाट का’

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:07AMपुणे : शंकर कवडे

पुनर्वसन होणार म्हणून महापालिकेने अगदी पाण्यापासून स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष केले आणि दुसरीकडे पुनर्वसनाची प्रक्रिया लालफितीत अडकल्याने राजीव गांधीनगर, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीधारकांची ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यासह परिसराला मेट्रो आणि स्मार्ट सिटीची झळाळी मिळत असताना एका बाजूस अंग चोरून वसलेली झोपडपट्टी मात्र दुर्लक्षितच राहात आहे. 

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधीनगर मिळून सुमारे दीड हजारांहून अधिक कुटुंबे या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मात्र, सध्या या झोपडपट्ट्यांमध्ये जागोजागी उंदीर व घुशींनी पोखरलेल्या जमिनी, तुंबलेले ड्रेनेज, तुटलेल्या फरशा, अस्वच्छ स्वच्छतागृहे, सार्वजनिक मुतार्‍यांची दुरवस्था असे काहीसे चित्र दिसून येत आहे. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असल्याने झोपडीधारकाचे जीवनमान उंचावून पक्क्या घरात जाण्याचे स्वप्न दाखविणारे प्रशासन या झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यातही अपयशी ठरले. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांसाठी शंभरहून अधिक कुटुंबे पात्र ठरली होती. मात्र, पुनर्वसन होणार असल्याने वैयक्तिक शौचालय मंजूर होऊनही पालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. झोपडपट्टीमध्ये असलेल्या शौचालयांची संख्या लोकसंख्येच्या मानाने खूपच कमी असून, असलेली शौचालये मोडकळीस आली आहेत. परिणामी, आजही मध्यवस्तीतील नागरिकांना उघड्यावर शौचास जाणे भाग पडत आहे. पिण्याच्या पाण्याच्या पुरेसा दाबाने पाणीपुरवठा आवश्यक असताना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबाबत, पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरीकांमधून होत आहे. 

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न रेंगाळला आहे. त्यामुळे झोपडीधारकाला पक्क्या स्वरुपातील झोपडी बांधताही येत नाही तसेच तिची दुरूस्तीही करता येत नाही. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर, पुरेशी प्रकाशव्यवस्था, समाज मंदिरांची दुरवस्था आदी अनेक समस्यांमुळे वसाहतीतील नागरीक त्रस्त झाले आहे. 

जागीच पुpनर्वसनाची प्रतीक्षा

सध्या शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामाच्या जागेवर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. एसआरए, महामेट्रो, महापालिका प्रशासन; तसेच स्थानिक लोकप्रतिनिंधींकडून हक्‍कांच्या घराचे पुनर्वसन केव्हा व कधी होणार याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.