Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Pune › पालिका डायरीत भरमसाट चुका 

पालिका डायरीत भरमसाट चुका 

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:00AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल दीड महिना उशिरा सन 2018 च्या दैनंदिनी (डायरी) छापूनही त्यात भरमसाट चुका असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे नगरसेवक, पदाधिकार्‍यांचे नाव, पद, संपर्क क्रमांक आणि मेल आयडी चुकले आहेत. चुका असलेल्या डायर्‍या वाटपास महापालिकेने सुरुवात केली आहे.  

महापालिकेच्या फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपने ताबा मिळविला. पदाधिकार्‍यांची निवडीस अर्ध वर्ष संपत आल्याने सत्ताधार्‍यांनी सन 2017 ची डायरी न छापण्याचा निर्णय घेतला. वर्ष संपता संपता सन 2017 ची ‘पाकीट डायरी’ छापण्यात आली. त्याचे प्रत्यक्ष वाटप डिसेंबर महिन्यात केले गेले. त्या डायर्‍याचे वाटपही सर्वांना झाले नसल्याची ओरड आहे. 

सन 2018 ची डायरी छापण्याचा निर्णय भाजपने घेतला. माहिती व जनसंपर्क विभागाची निष्क्रियता व ढिसाळ नियोजनामुळे डायरी छापून येण्यास तब्बल दीड महिन्याचा विलंब झाला. तीन दिवसांपासून या डायर्‍या वाटपास सुरुवात झाली आहे. त्यात असंख्य चुका असल्याचे समोर आले आहे. 

डायरीमध्ये पालिकेसह पुणे पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, प्राधिकरण, पीएमआरडीए, पीएमपीएल,  एमआयडीसी, महावितरण आदी विभागांचे अधिकारी व संबंधित पदाधिकारी, तसेच राज्याचे मंत्री, आमदार व खासदार यांच्या नावासह त्यांचे संपर्क क्रमांक, कार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांकाची माहिती दिली आहे. मात्र, डायरीमधील मजकुरात शेकडो चुका आढळून येत आहेत. पीएमपीएलचे संचालक आयुक्त श्रावण हर्डीकर आहेत. मात्र, या डायरीमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त अशी नोंद केली आहे. माहिती व जनसंपर्क विभागाची चूक निदर्शनास आली आहे. 

आपली चूक झाकण्यासाठी वादग्रस्त अधिकारी अण्णा बोदडे यांनी त्यावर दुरुस्तीचे लेबल चिकटवले आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. दुसरीकडे आयुक्त हर्डीकर स्वत:च्या मोबाईलवर थेट व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रारी करण्याचे आवाहन शहरवासीयांना करतात. मात्र, त्यांच्या हाताखालील अधिकारीच त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा विरोधाभास यातून दिसत आहे. 

डायरीचे मुद्रितशोधन बोदडे आणि त्यांच्या विभागाने केले आहे. तरीही शेकडो चुका आढळून येत असल्यामुळे बोदडे यांचे चुकीचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे. त्याचबरोबर काही नगरसेवक, पदाधिकारी तसेच, प्रसारमाध्यमांचे क्रमांक, मेल आयडी व कार्यालयाचे पत्ते देखील चुकविले आहेत. त्यामुळे त्यांचे कामकाज संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. 

‘पुढारी’च्या वृत्ताची दखल

‘सव्वा महिना उलटूनही महापालिका डायरी अदृश्यच; शिस्तबद्ध भाजपा कारभारावर प्रश्‍नचिन्ह’ हे वृत्त ‘पुढारी’ने 11 फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने डायरी तत्काळ छापून मागून घेतल्या. डायरी वाटप गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. मध्यवर्ती भांडार विभागामार्फत एकूण 8 हजार डायर्‍या छापण्यात आल्या. एका डायरीस 105 रुपये 50 पैसे प्रमाणे एकूण 8 लाख 28 हजार रुपये खर्च झाला. त्यास स्थायी समितीने 22 नोव्हेंबर 2017 च्या सभेत मान्यता दिली होती.