होमपेज › Pune › कंपन्याधार्जिणे धोरण दूध उत्पादकांच्या मूळावर

कंपन्याधार्जिणे धोरण दूध उत्पादकांच्या मूळावर

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 13 2018 12:47AMपुणे : दिगंबर दराडे

दूधत्पादकांना सरळ मदत देण्याऐवजी सरकारकडून घेण्यात येत असलेले अढेवेढे दूधत्पादकांच्या मूळावर आले आहेत. दूधाच्या संदर्भात नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचा फायदा दूधत्पादकांऐवजी दूधकंपन्यांना सर्वाधिक होणार असल्याने दूधत्पादकांच्यामध्ये नैराश्य आले आहे.

सरकार वारंवार दूध पावडर बनविणार्‍या कंपन्यांना मदत करण्याची भूमिका घेत आहे. यामुळे ‘जखम पायाला’ आणि ‘मलम डोक्याला’ अशीच परिस्थिती होत असल्याने दूधत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. दूधदरातील घसरण रोखण्यासाठी सरकारने दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये व दुधाला प्रतिलिटर पाच रुपये ‘निर्यात अनुदान’ जाहीर केले आहे. देशाबाहेर निर्यात होणार्‍या दुधाचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे साठे पडून आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत भारतातील दुधातील ‘रेसिड्यू’चे प्रमाण पाहता दूध निर्यातीला मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत दूध व दूध पावडर निर्यातीला अनुदान देण्याचा कोणताही सकारात्मक परिणाम राज्यातील दुधाचे दर वाढण्यासाठी होणार नाही हे उघड आहे. शिवाय निर्यात अनुदानाचा फायदा घेण्यासाठी दुधाला किमान 27 रुपये दर देण्याचे बंधन दूध संघ व कंपन्यांवर घालणे आवश्यक होते. असे बंधन नसल्याने कंपन्यांच्या गोदामात पडून असलेल्या पावडरवरच निर्यात अनुदान लाटले जाणार हे उघड आहे. त्यामुळे दूध उत्पाकांच्या पदरी काहीच पडणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे.