Sat, Jul 20, 2019 13:16होमपेज › Pune › अवघा रंग एक झाला

अवघा रंग एक झाला

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:29AMपुणे : प्रतिनिधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व तुकाराम महाराजांची पालखी  शहरात दाखल झाल्यानंतर प्रत्येक पुणेकर भक्तिसागरात बुडाल्याचे चित्र दिसून येत होते. शहरात विविध ठिकाणी वारकर्‍यांसाठी सोय करण्यात आली होती. तर अनेक ठिकाणी संतरचना, अभगांनी वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न झाले होते. जय हरी विठ्ठल... हे शब्द प्रत्येक पुणेकरांच्या तोंडी ऐकावयास मिळाले. तर हरी स्मरणाच्या नामाने अवघा रंग एक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, पालख्यांचे सोमवारी प्रस्थान होणार असून संत ज्ञानेश्‍वर माउलींचा मुक्काम सासवड येथे, तर तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोर येथे होणार आहे.पालखी सोहळ्यातील वारकर्‍याची पुणेकरांनी मनोभावे सेवा केली. आळंदी आणि देहू प्रस्थानानंतर शहरात विसावलेल्या वारकर्‍यांसाठी नागरिकांनी चहापान, नाष्टा, आंघोळीची सोय, जेवण, मोफत रिक्षा प्रवास, शिवणकाम, पावसापासून बचावात्मक आवरण, आरोग्यसेवा अशा विविध सेवांची सोय केली होती.

विठुनामाचा गजर, भजन- कीर्तन, टाळ-मृदंगाचा आवाज अशा भक्तिमय वातावरणात वारकर्‍यांसहित नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. ठिकठिकाणी सामाजिक संस्था, मित्रमंडळे यांसह महिला बचतगटाच्या माध्यमातून वारकर्‍यांची सेवा केली. दरम्यान, शनिवारवाडा, लाल महाल, विश्रामबागवाडा, सारसबाग, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दगडूशेठ हलवाई गणपती ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी वारकर्‍यांनी गर्दी केली होती.

ज्ञानेश्‍वर महाराज व तुकोबारायांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहराच्या कानाकोपर्‍यासह उपनगरातील नागरिकांची दर्शनासाठी ओढ पाहायला मिळाली. पान-फूल, हार फुले, बुका, प्रसाद विक्रेत्यांची गर्दी लक्षणीय होती. सायंकाळी सातनंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शन घेण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागत होता. मात्र, दोन्ही पालखी स्थळावरती महिला व पुरुषांच्या स्वतंत्र्य दर्शन रांगा असल्यामुळे दर्शनाचा वेग वाढला होता.