होमपेज › Pune › सहकारमंत्र्यांना फिरू देणार नाही

सहकारमंत्र्यांना फिरू देणार नाही

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

उसाच्या थकीत एफआरपीप्रश्‍नी साखर आयुक्तांनी जप्तीचे आदेश काढून शेतकर्‍यांची रक्कम देण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दिलेले आहेत. त्यामधील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिलेली आहे. पुढील तीन दिवसांत ही स्थगिती न उठविल्यास सहकारमंत्र्यांना घेराव घालून फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

स्वाभिमानीने थकीत एफआरपीप्रश्‍नी साखर संकुलवर 29 जून रोजी मोर्चा काढून कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच 21 जुलैपर्यंत साखर आयुक्तांनी अवधी मागितला होता. त्यानुसार संघटनेचे शिष्टमंडळ शनिवारी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांना भेटले. त्यावेळी साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे उपस्थित होते. शिष्टमंडळात संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे, पृथ्वीराज जाचक, राजेंद्र ढवाण पाटील, रौनक शेट्टी, सुरेंद्र पंढरपुरे आदींचा समावेश होता. सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल या खासगी कारखान्याच्या एफआरपीचे 14 कोटी थकीत आहेत. या कारखान्यांवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्‍नही यावेळी उपस्थित करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी कळविली आहे. 

एफआरपीच्या रकमेसाठीच्या जप्ती आदेशास सहकारमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमध्ये सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी आणि किसनवीर खंडाळा सहकारी, बीडमधील जय भवानी सहकारी आणि जय महेश खासगी कारखाना तसेच सातारा जिल्ह्यातील न्यू फलटण शुगर्स यांचा समावेश आहे. स्थगिती उठविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली असून न झाल्यास सहकारमंत्र्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिल्याचे पांडे यांनी कळविले आहे.