Fri, Apr 19, 2019 12:24होमपेज › Pune › बंद करा.. बंद करा... अन् आता चालू करा!

बंद करा.. बंद करा... अन् आता चालू करा!

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:38AMपुणे : विजय मोरे 

शहरातील अवैध धंदे गेले पंधरा दिवस पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. परंतु, सोमवारपासून (दि. 14) अचानक ते सुरू करण्यास त्या-त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी सांगितले. अचानक अवैध धंदे बंद कसे झाले आणि पुन्हा सुरू कसे झाले, यातील गूढाविषयी शहरातील अवैध धंदेवाल्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

शहर आणि उपनगरांत एकूण 32 पोलिस ठाणी आहेत. पंधरा दिवसांपूर्वी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, लॉटरी स्टॉल आदी अवैध धंदेवाल्यांना सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वसुलीवाल्यांनी प्रत्यक्ष अवैध धंद्यांच्या अड्ड्यांवर जाऊन त्या धंदेवाल्यांना सूचना दिल्या होत्या. अचानक अवैध धंदे बंद ठेवण्यास सांगितल्याने, धंदेवालेही अवाक् झाले होते. या बंद काळात अवैध धंदेवाल्यांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती; तर महिनाभर अगोदरच लाखोंचे हप्ते दिलेल्या धंदेवाल्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. 

दरम्यान, धंदे कधी सुरू होणार याकडे डोळे लावून बसलेल्या धंदेवाल्यांना सोमवारी (दि. 14) वसुलीवाल्यांनीच गोड बातमी दिली. अवैध धंदे पुन्हा सुरू करा, असे सांगण्यात आल्याने काही मटकेवाल्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला, तर ऑनलाईन लॉटरी धंदा करणार्‍यांनी दुकानातील देवदेवतांच्या फोटोला मोठमोठे हार लावून पूजा केली. पण, अचानक अवैध धंदे बंद करण्याचे आदेश का आले आणि अचानक पुन्हा सुरू करण्यास का सांगितले, सेटलमेंट झाली कशी, कोणी काय केले? याचीच जोरदार चर्चा शहर आणि उपनगरातील अवैध धंदेवाल्यांमध्ये सुरू आहे.