Sun, May 26, 2019 00:36होमपेज › Pune › शहर शिवसेनेला लवकरच खिंडार

शहर शिवसेनेला लवकरच खिंडार

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:25AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला लवकरच मोठे खिंडार पडणार आहे. लोकसभा, विधानसभेसाठी कार्यकर्त्यांचा वापर करून घेण्याची नेत्यांची प्रवृत्ती, सामान्य कार्यकर्त्यांकडे होणारे  दुर्लक्ष, पक्षांतर्गत गटबाजी आदींना  कंटाळलेले अनेक कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. मात्र यापूर्वी भाजपच्या वाटेवर असलेल्या योगेश बाबर यांना सेनेने शहरप्रमुखपद देऊन तेथेच रोखून धरण्याची खेळी केली. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने या कार्यकर्त्यांच्या नावांबाबत  गुप्तता बाळगली आहे.

शहरात भाडेकरूंवरील अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी काळभोरनगरला शिवसेनेचे रोपटे लावले गेले. फुगेवाडी शाखेचे उद्घाटन तर खुद्द शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाले होते.  मात्र  सत्तासंघर्षात इथली शिवसेना पोखरली गेली. स्थानिक नेत्यांमधील विविध संघर्ष शिवसैनिकांनी अनुभवले. 2014 च्या लोकसभेला मावळातून सेनेने उमेदवारी नाकारल्याने तत्कालीन खा. गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले व मनसेत प्रवेश केला.  शेकापच्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली. पुढे भाजपात प्रवेश केला. लोकसभेला युतीतर्फे  मावळातून श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव हे सेनेचे खासदार निवडून आले. विधानसभेला युती तुटली पिंपरीतून सेनेचे गौतम चाबुकस्वार विजयी झाले. भोसरी व चिंचवडमध्ये सेनेचा पराभव झाला. महापालिकेच्या निवडणुकीतही सेनेचा दारुण पराभव झाला.  या निवडणुकीत सेनेचे उपशहरप्रमुख शाम लांडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.   संत तुकारामनगर कासारवाडी प्रभागातून ते निवडूनही आले.

सेनेने उमेदवारी नाकारल्याने योगेश बाबर, दीपा दिलीप आंब्रे, अमर कापसे यांनी बंडखोरी केली. यातील बाबर व आंब्रे यांनी लक्षणीय मते मिळवली.  राष्ट्रवादीतून सेनेने आयात केलेल्या उर्मिला काळभोर, दत्तात्रय वाघेरे, विजय कापसे यांनाही मतदारांनी नाकारले.  राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या असंतोषाचा लाभ उठविण्यात सेना अपयशी ठरली. गटबाजी, पक्षबांधणीकडे दुर्लक्ष, युतीच्या आशेने विजयाचा फाजील आत्मविश्‍वास, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव, पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठविण्यात आलेले अपयश, चुकीचे तिकीट वाटप यामुळे  सेनेचे संख्याबळ 15 वरून  9 वर घसरले.

निवडणुकीनंतर ‘स्थायी’साठी प्रमोद कुटे यांना डावलल्याने पक्षात धुसफूस वाढली. त्यातच भाजपाने स्मार्ट सिटी कंपनी, वृक्ष प्राधिकरण समितीवर सेनेला न विचारता प्रमोद कुटे व सचिन भोसले यांच्या परस्पर नियुक्त्या करून सेनेत भांडणे लावून दिली. भोसले यांनी समितीचा राजीनामा दिला; मात्र कुटे राजीनाम्यास तयार नसल्याने गटनेते राहुल कलाटे यांनी या नियुक्तीस न्यायालयात आव्हान दिले. पुढे नवीन शहर प्रमुखपदासाठी शोध सुरू झाला  खा. आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे, तर खा. बारणे यांनी योगेश बाबर यांच्या नावाची शिफारस केली बाबर यांच्या नियुक्तीची घोषणा होताच पक्षात वादळ उठले ते काही दिवसांनी शांत झाले; पण आत वेगळीच खदखद सुरू आहे. 

नावाबाबत मात्र गुप्‍तता

महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज झालेले; तसेच पक्षाने तिकीट दिले, पण निवडून येण्यासाठी ताकद दिली नाही म्हणून अस्वस्थ असलेले कार्यकर्ते सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, सेनेतून भाजपात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांच्या नावांबाबत भाजपकडून गुप्तता बाळगली जात आहे.