Tue, Jul 23, 2019 02:22होमपेज › Pune › शहर ‘हॉकर्स’ व ‘पार्किंग’ धोरण निश्‍चित 

शहर ‘हॉकर्स’ व ‘पार्किंग’ धोरण निश्‍चित 

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 12:53AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

झपाट्याने विकसित होणार्‍या पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार नव्याने ‘हॉकर्स’ धोरण पिंपरी-चिंचवड महापालिकेने निश्‍चित केले आहे. त्याला अनुसरून ‘पार्किंग झोन’ तयार केले आहेत. जानेवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडले जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि.14) सांगितले. 

पदपथांवर अनधिकृत हातगाड्या, टपर्‍या आणि पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे; तसेच दुचाकी, रिक्षा आणि मोटार वाहनांकडून बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे शहरातील प्रशस्त रस्ते अपुरे पडत असून, वाहतूक समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात ते बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते वाहतुकीसाठी ‘हॉकर्स’ व ‘पार्किंग’ या दोन प्रमुख समस्या आहेत. या दोन्ही समस्या कायद्यानुसार सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. 

शहरात एकूण 248 ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ निश्‍चित केले आहेत. त्यांना जागेचे वाटप केले जात आहे. रेल्वे स्थानक आणि रुग्णालयापासून विशिष्ट अंतरावर ‘हॉकर्स झोन’ उभारण्याचे निर्देश न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार बदल करून घेण्यात येत आहेत. नोंदणीकृत ‘हॉकर्स’ना परवानगी देऊन अनधिकृत ‘हॉकर्स’वर कारवाई केली जाईल. 

शहरातील विविध भागांत ‘पार्किंग झोन’ही निश्‍चित केले आहेत. मोफत व सशुल्क पार्किंग, उपलब्ध जागेत पार्किंग, रहिवासी, बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी पार्किंग, सम व विषम तारखेस पार्किंग, एकेरी पार्किंग आदी पद्धतीने पार्किंग क्षेत्र ठरविण्यात आले आहेत. काही ठिकाणी अद्ययावत पार्किंग झोन असतील. बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी 2 वाहने खरेदी केली जाणार आहेत. वाहतूक समस्येतून मार्ग काढण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जाईल. हे धोरण जानेवारीतील सर्वसाधारण सभेत मांडले जाईल. मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी होईल 

कारवाई करता येत  नसल्याने आयुक्त हतबल

शहरातील अनधिकृत हातगाडी, फेरीवाले आणि टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या समस्येवर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्या विषयावर आयुक्त हर्डीकर संतापून म्हणाले की, रस्त्यावरील केवळ हॉकर्सचे अतिक्रमण सर्वांना दिसते का? त्यांच्यावरच वारंवार का ठपका ठेवता? बेकायदेशीर वाहन पाकिर्र्ंगबाबत कोणीच बोलत नाही. त्यामध्ये गरीब व श्रीमंत असा भेद होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. स्वत:ला सावरत ते म्हणाले की, दोन्ही बाबींवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.