Wed, Apr 24, 2019 11:41होमपेज › Pune › बोपखेल पुलासंदर्भात पालिकेचा चालढकलपणा

बोपखेल पुलासंदर्भात पालिकेचा चालढकलपणा

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:32AMपिंपरी : प्रतिनिधी

बोपखेल व खडकी जोडण्यासाठी मुळा नदीवर उभारण्यात येणार्‍या पुलासाठी लागणार्‍या जागेच्या बदल्यास संरक्षण विभागाने 26 कोटींची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे. मात्र, ही रक्कम भरण्यास पालिका प्रशासन उत्सुक नाही. सदर रक्कम माफ करण्याबाबतचे विनंती पत्र पालिकेने संरक्षण विभागास पाठविले आहे. मात्र, संरक्षण विभागाने त्यास अनुकूल नाही. त्यामुळे पुल उभारणीस विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

पुलासाठी पालिकेने खडकीच्या अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीची जागा लागत आहे. त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात 42 कोटी खर्चाची तरतूद केली आहे. ही तरतूद करून सुमारे दोन वर्षांचा कालावधी होत आलाआहे. सदर पुलासाठी जागा देण्यास व ना हरकत प्रमाणपत्र देण्यास संरक्षण विभागाने अखेर मान्यता दिली आहे. त्या बदल्यात पर्यायी जागेसह 25 कोटी  81 लाख 51 हजार  200 रुपयांची मागणी पालिकेकडे केली आहे. सदर रक्कम जमा केल्यानंतर पालिकेस जागेचे हस्तांतरण केले जाईल, असे संरक्षण विभागाची भूमिका आहे. त्यासंदर्भातील पत्र संरक्षण खात्याचे रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना 4 एप्रिलला पाठविले होते. सदर रक्कम अदा केल्याशिवाय जागा न देण्याबाबत संरक्षण विभाग ठाम आहे. 

मात्र, सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर व पालिकेची बचत व्हावी म्हणून सदर रक्कम माफ करण्याबाबतचे पत्र पालिकेने संरक्षण विभागास पाठविले आहे. या बाबत संरक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. सदर रक्कम भरणे अत्यावश्यक असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांचे मत आहे.  पालिकेची आर्थिक क्षमता पाहता ही रक्कम खूपच कमी आहे. बोपखेलच्या नागरिकांच्या सोईसाठी सदर पुल अत्यावश्यक असून, नागरिकांना तब्बल 10 ते 15 किलोमीटर अंतराचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. या संदर्भात ‘पुढारी’ने वेळोवेळी छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले आहेत. तसेच, नागरिकांना अनेकदा आंदोलनेही केली आहेत. 

नागरिकांची गरज लक्षात घेऊन हा पुल  लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. संरक्षण विभागाकडून ‘हिरवा कंदील’ मिळूनही पालिका प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने त्यास अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात संरक्षण विभागातील मंत्री व अधिकार्‍यांची बदली झाल्यास या प्रकरणी नवीन समस्या डोकेवर काढू शकते. त्यामुळे पालिकेने तत्काळ निधी मंजूर करून 512 
आर्मी बेस वर्कशॉपची जागा ताब्यात घेणे गरजेचे असल्याचे बोपखेलच्या त्रस्त नागरिकांचे मत आहे.

‘बोपखेल’प्रकरणी बुधवारच्या ‘स्थायी’ सभेत निर्णय

बोपखेल पुलासाठी संरक्षण विभागास सुमारे 26 कोटी रूपये अदा करण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.9) होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे. त्या संदर्भात स्थापत्य विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रस्ताव दिला आहे. सभेत त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले.