Mon, May 27, 2019 07:01होमपेज › Pune › न्यायासाठी चिमुकलेही रस्त्यावर

न्यायासाठी चिमुकलेही रस्त्यावर

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

कठुआ आणि उन्नाव येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. हातात बलात्कार्‍यांना फाशी देण्याची मागणी करणारे, तसेच चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे असे लिहिलेले पोस्टर घेण्यात आले होते. घोषणा दिल्यानंतर काही काळ रास्ता रोको करुन रस्त्यातच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.

एस. पी. महाविद्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. यात विविध सामजिक संघटनांच्या कार्यकत्यांबरोबरच चिमुकलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  या आंदोलनात भारतीय महिला शक्ती केंद्र, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय दलित पँथर, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, कम्युनिस्ट पार्टी, आरोग्य फाऊंडेशन, एमआयएम, फॅमिली कोर्ट बार असोसिएशन, रिपब्लिकन युवा मोर्चा आदी संस्था, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. कठुआ घटनेतील चिमुकलीला न्यायाची मागणी हे चिमुकले यावेळी करत होते. 

यावेळी बोलताना ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या प्रभावामुळे बलात्काराचे गुन्हे करणार्‍यांना मोकाट सोडलं जात असल्याचे दिसून येत आहे. बलात्कार्‍यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून भाजपचे मंत्री रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. इतकी भयानक अराजकता व संवेदनशुन्यता कधीच निर्माण झाली नव्हती. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही येथे जमा झाले आहोत. देशातली जनता या सरकारला खाली खेचून बलात्कार्‍यांना पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले, बलात्कार्‍यांच्या पाठीशी जर भाजपचे नेते, कार्यकर्ते उभे राहत असतील तर आम्हाला लाज वाटते की आम्ही अश्या नालायक सरकारला निवडून दिलं, जे नागरिकांना तसेच मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही. या देशात महिला सुरक्षित नाहीत तसेच सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. कठुआ व उन्नाव घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. 

Tags : Pune, children, justice, road