Sun, Mar 24, 2019 23:16
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › महेश मोतेवारच्या मुलासह चौघांवर आरोपपत्र दाखल

महेश मोतेवारच्या मुलासह चौघांवर आरोपपत्र दाखल

Published On: Jun 11 2018 1:25AM | Last Updated: Jun 11 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्धी जीवन मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चा प्रमुख महेश मोतेवार याच्या मुलासह चौघांवर विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल 7 हजार 212 पानांचे हे दोषारोपत्र आहे.  

अभिषेक महेश मोतेवार (21, रा. गणराज हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी) आणि प्रसाद किशोर पारसवार (32, रा. कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी), महेंद्र वसंत गाडे आणि सुनीता किसन थोरात अशा चौघांवर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य आरोपी महेश मोतेवार आणि त्याची पत्नी लीना या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून दोघे तुरुंगात आहेत. या प्रकरणात किरण शांतिकुमार दीक्षित (वय 53, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे.   

30 जुलै 2015 ते 28 सप्टेंबर 2016 या कालावधीत समृद्धी जीवन मल्टिस्टेट मल्टी पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या माध्यमातून संचालकांनी फिर्यादींसह इतरांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सोसायटीकडे विश्वासाने गुंतवणूक केलेल्या रकमेचा अपहार केला. या गुन्ह्यात तब्बल 2 कोटी 18 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक झाली. अभिषेक हा महेश मोतेवाराचा मुलगा आहे. वैशाली मोतेवार हिने मुलाच्या मदतीने समद्धी जीवन कंपनीच्या नावावर नागरिकांकडून पैसे घेतले; परंतु त्याचा मोबदला दिला नाही. मालमत्ता घेऊन तिची विल्हेवाट लावण्यामध्ये अभिषेकचा सहभाग आहे. त्यांनी परस्पर विक्रीचे व्यवहार केले असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. या प्रकरणी भादंवि कलम 409, 406, 120 (ब), 420, 34 तसेच महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ज्योती क्षीरसागर यांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.