Sat, Nov 17, 2018 12:26



होमपेज › Pune › मुंबईत येते, बोट लावून दाखवा : पुण्याच्या मुलीचे राम कदम यांना जाहीर आव्हान

मुंबईत येते, बोट लावून दाखवा : पुण्याच्या मुलीचे राम कदम यांना जाहीर आव्हान

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AM



पुणे : प्रतिनिधी 

दहीहंडी उत्सवात महिलासंबंधी केलेल्या बेताल वक्‍तव्यावरून भाजप आमदार राम कदम यांना पुण्याच्या मीनाक्षी डिंबळे-पाटील या तरुणीने  जाहीर आव्हान  दिले आहे.  दरम्यान राम कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली असली तरी राज्यभरातून टीकेचा भडिमार होत आहे.

मुलीने नकार दिला तर तिला पळवून आणू, असे बेताल वक्‍तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. विरोधक आणि विविध संघटनांनी त्यांचा निषेध करीत कारवाईची मागणी केली. घाटकोपर दहीहंडी उत्सवात बोलताना राम कदम यांनी हे बेताल वक्‍तव्य केले होते. राम कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली असली तरी  या दिलगिरीने विरोधकांचे समाधान झाले नसून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कायम आहे.

मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर निदर्शने करीत त्यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कदम यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली. कदम यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्‍त केला. तर, सातार्‍यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचीही गाडी अडविण्यात आली. पंढरपूर, औरंगाबाद, इंदापूर आदी ठिकाणीही त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही कदम यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर कदम यांच्यावर कारवाई झाली नाही, तर येणारे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला.

भाजपकडून कारवाई नाही

राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रदेश भाजपने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. कदम यांचे वक्‍तव्य तपासण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले, तरी कारवाई करण्याच्या मागणीवर मात्र कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुली पळवण्याचे वक्‍तव्य सत्तेचा माज म्हणायचा का? ः अजित पवार

तुम्हाला मुलगी पसंत आली असेल तर मला कळवा, मी तिला पळवून आणून तुम्हाला देईन, या वक्‍तव्याला सत्तेचा माज म्हणायचा का? अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राम कदम आणि भाजपवर हल्लाबोल केला. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आ. कदम यांनी हे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. त्याचा जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभात पवारांनी खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले, मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ... ही कुठली भाषा? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी? समाज तरी कसा सहन करतो. ही घमेंडशाहीची, मस्तीची भाषा आहे. हा भाजपच्या आमदारांना सत्तेचा आलेला माज म्हणायचा का?