Tue, Jul 16, 2019 22:09होमपेज › Pune › केंद्र व राज्यातील सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी

केंद्र व राज्यातील सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

केंद्र व राज्यातील  सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि.26) सरकार विरोधात हनुमान मंदिर, आकुर्डी गावठाणपासून प्राधिकरणातील तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी प्राधिकरण कार्यालयासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे,  विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी महापौर मंगला कदम, राजू मिसाळ,  मच्छिंद्र तापकीर, उषा वाघेरे, माई काटे, राहुल भोसले, श्याम लांडे,  आदी उपस्थित होते.

‘हल्लाबोल’ आंदोलकांच्या हातात ‘स्मार्ट सिटीचे सल्लागार, कोट्यवधींची लुटमार, आरोग्य सेवेच झालं असं, सामान्यांनी जगायचं कसं, खड्डेच खड्डे रस्त्यावर सरकार नाही भानावर, ढीम्म सरकारला हलवू चला, फसवं सरकार हटवू,’ या असे घोषणफलक लक्ष वेधून घेत होते.

अजित पवार यांनी भाषणात सरकारवर कडाडून टीका केली. केंद्र व राज्य सरकार बेजबाबदार आहे. सर्व पातळ्यांवर सरकार अपयशी ठरल्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे. 

राष्ट्रवादीच्या राज्यात मी ऊर्जामंत्री असताना भारनियमन बंद होते. यांनी कोळसा घ्यायला पैसे नाहीत म्हणून वीजकपात केली. ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ते  पोलिसच यांच्या राज्यात जनतेला मारत आहेत, असे सांगत त्यांनी सांगलीतील अनिकेत कोथळेचे उदाहरण दिले.

कोणताही कर लावताना माणूस उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. ‘जीएसटी’ लावताना छोटे व्यापारी, सामान्यांचा विचार केला नाही. आमची सत्ता असताना शहराला स्वच्छतेचा मान मिळवून दिला. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न, रेड झोनचा प्रश्नही तसाच आहे, असे पवार म्हणाले.भाजपने केवळ जाहिरातबाजी केली.

प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते. 2 कोटी तरुणांना नोकर्‍या देणार होते त्याचे काय झाले? धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे काय झाले, असा सवाल पवार यांनी केला.सव्वा लाख कोटी खर्चून बुलेट ट्रेन करायला निघाले आहेत. आधी नीट सुविधा द्या. मेट्रो, ‘बीआरटी’, चांगली करा, रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा, लोकल ट्रेन वाढवा, मग बुलेट ट्रेन आणा, असे पवार म्हणाले.