Thu, Jun 27, 2019 18:05होमपेज › Pune › मानसिक स्वास्थ्य संस्थेचे केंद्र आता पुण्यात

मानसिक स्वास्थ्य संस्थेचे केंद्र आता पुण्यात

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 11:42PMपुणे : प्रतिनिधी

मनआरोग्य क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्‍या ठाणे येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ’ या स्वयंसेवी संस्थेचे उपकेंद्र पुण्यात कर्वेनगर येथे सुरू होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन दि. 24 रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी नगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृह येथे होणार आहे. यावेळी ‘मन थार्‍यावर तर जग जाग्यावर’ हा गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संवादसत्रात डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ पोलिस अधिकारी डॉ. सदानंद दाते, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, कादंबरीकार सानिया, यांच्याशी डॉ. आनंद नाडकर्णी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला आहे अशी माहिती संस्थेतर्फे मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. सुखदा उपस्थित होत्या.

या उपकेंद्राबाबत अधिक माहिती देताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, मानसिक आरोग्य क्षेत्रातील सर्वसमावेशक सेवा देणेे हा या उपकेंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रात पालकशाळा, संताप नियोजन, विवेकनिष्ठ मानसोपचार अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी मनोविकारतज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांचा सल्ला व समुपदेशन मिळणार आहे. तसेच आरोग्य विषयक विविध स्वमदत गट तयार करण्यात येणार आहेत.

या गटाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालये,आयटी कंपन्या अशा विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. यात ‘स्क्रीझोफ्रेनिया’सारखे आजार, व्यसनमुक्ती, एपिलेप्सी, कॅन्सर, डायबेटीस अशा अनेक स्वमदत गटांचा समावेश असणार आहेत, तसेच खेळाडूंच्या मानसिक कौशल्यासाठीचा खास विभाग असणार आहे, असे नाडकर्णी यांनी सांगितले. मानसिक आरोग्य आणि समाज यांच्यामधील अज्ञान आणि गैरसमजुतींची दरी दूर करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून, लोकांनी सुदृढ मनासाठी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Tags : pune, pune news, mental health institute,