Tue, Aug 20, 2019 04:57होमपेज › Pune › ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थ्यांचे खटले रेंगाळले

‘एफटीआयआय’मधील विद्यार्थ्यांचे खटले रेंगाळले

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 11:59PMपुणे : महेंद्र कांबळे 

अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीवरून आंदोलन करणार्‍या  भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) 35 विद्यार्थ्यांवर  14 मार्च 2016 रोजी आरोपपत्र दाखल होऊनही अद्याप त्यांच्यावर दोषारोप निश्‍चिती झाली नाही. सर्व विद्यार्थी आरोप निश्‍चितीसाठी एकत्र येत नसल्याने या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून ‘तारीख पे तारीखच’ पहावयास मिळत आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांच्या न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे.

एफटीआयआयच्या कर्मचार्‍यांना कार्यलयीन वेळ संपल्यानंतर कार्यालयात रोखून ठेवणे, कार्यालयीन साहित्याची तोडफोड केल्याबाबत विकास अर्स, हिमांशू प्रजापती, सचिन पॉलोस, अमय गोरे, राजू बिस्वास, ग्यान गौरव व इतर या विद्यार्थ्यांवर दोन वर्षांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.  ‘एफटीआयआय’चे तत्कालीन संचालक प्रशांत पाठराबे यांनी याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 12 विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. काही विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांना जामीनही मंजूर केला. सध्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर काम पाहत आहेत. संस्थेतील पदाधिकार्‍यांच्या बदल्या होऊनही दोन वर्षांपासून निश्‍चिती झालेली नसल्याचेच चित्र आहे. खटल्यात सहायक सरकारी अभियोक्‍ता उज्ज्वला पवार काम पाहत आहेत.