Fri, Feb 22, 2019 21:51होमपेज › Pune › खुषखबर! ट्रकची वहनक्षमता वाढली

खुषखबर! ट्रकची वहनक्षमता वाढली

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

मालवाहतूक करण्यार्‍या ट्रकमध्ये अधिक टनांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून इंधन दरवाढीचा फटका सहन करणार्‍या ट्रकमालकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या वतीने मालवाहतुकीच्या नियमात बदल केले आहेत. त्यामुळे परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार ट्रकचालकांना पूर्वीपेक्षा 2 ते 6 टन मालाची अधिक वाहतूक करण्यात येणार आहे. 

मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांना क्षमतेपेक्षा अधिक मालाची ने-आण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यातच दर महिन्याला इंधनदरवाढीमुळे ट्रकचालकांना आर्थिक  भुर्दंड सहन करावा लागत होता. परिणामी खुष्कीच्या मार्गाने जादा मालाची वाहतूक केली जात होती. त्यामुळे शासनाचा अधिक महसूल बुडत होता. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने मालवाहतुकीच्या नियमात शिथिलता करून अधिक माल वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात अध्यादेश काढून सर्व आरटीओ कार्यालयांना सूचित केले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडून पे लोड अ‍ॅक्सेलबाबत आदेश काढण्यात आला नव्हता. परिणामी चोरट्या मार्गाने अधिक मालाची वाहतूक करण्यात येत होती. दरम्यान, कमी क्षमतेच्या वाहनांद्वारे अधिक मालाची वाहतूक केल्यास आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र, केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रत्येक मालवाहू वाहनांच्या क्षमतेनुसार अधिक माल वाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात वहनक्षमतेचा नियम लागू करण्यासाठी मालवाहतूक संघटनेच्या वतीने परिवहन सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे बाबा शिंदे यांनी दिली.