Tue, Mar 26, 2019 11:38होमपेज › Pune › व्यावसायिकाला साडेतीन लाखांना लुटले 

व्यावसायिकाला साडेतीन लाखांना लुटले 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:54AMपुणे : प्रतिनिधी

वाईन शॉपीत जमलेली  साडेतीन लाखांची रोकड दुचाकीवर घेऊन निघालेल्या व्यावसायिकाला दुचाकीवर आलेल्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क येथील हेमंत करकरे चौकाजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.  दरम्यान काही दिवसांपूर्वीच बिबवेवाडी-कोेंढवा रोडवर भरदिवसा पेट्रोल पंपाची 27 लाखांची रोकड घेऊन जाणार्‍या कामगारांना दुचाकीस्वारांनी लुटले होते. एक महिन्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत पाच जणांना अटक केली. त्यानंतर आता वाईन शॉपी चालकाला लुटण्यात आले आहे.  शहरातील लुटमारीचा धुमाकूळ रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे अशा प्रकारच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे.

व्यंकटरमण रामाचारी सीव्ही (वय 59, रा. गणेशनगर, वडगावशेरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन दुचाकीवरील पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचा चुलतभाऊ नम्रपाल हरिश्‍चंद्र चुडासमा यांचे लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट येथे पीटर वाईन शॉप हे दुकान आहे. दिवसभर नम्रपाल दुकानी असतात. तर, रात्री फिर्यादी दुकानात थांबतात. त्यानंतर तेच दुकान बंद करून दिवसभरातील जमलेली रोकड घेऊन चुलतभाऊ नम्रपाल यांच्या घरी जातात. दरम्यान सोमवारी त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडले होते. त्यांचे भाऊ नम्रपाल हे दुकानात होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानात आले. त्यानंतर नम्रपाल हे निघून गेले.

रात्री पावणेअकरा वाजता फिर्यादींनी दुकान बंद केले. तसेच, दिवसभरात जमलेली साडेतीन लाख रुपयांची रोकड एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली व ती दुचाकीला अडकवून चुलत भावाच्या घरी जाण्यासाठी निघाले. ते अकरा वाजण्याच्या सुमारास वाडीया कॉलेज बंडगार्डन रोडने कै. हेमंत करकरे चौकातून (तनिष्का चौक) उजवीकडे वळून हार्मस को-ऑपरेटिव्ह सोसायटीजवळ आले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी फिर्यादींच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावली आणि त्यांना थांबवले. त्याचवळी पाठीमागून दुसर्‍या दुचाकीवर तिघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील पाठीमागे बसलेल्याने फिर्यादींच्या दुचाकीला अडकवलेली साडेतीन लाखांची रोकड असणारी प्लास्टिकची पिशवी जबरदस्तीने हिसका मारून ओढून नेली. फिर्यादींना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोर-चोर असा आरडाओरडा केला. परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कोरगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक आर. जे. पाटील हे करत आहेत.

धुमाकूळ सुरूच

गेल्या महिन्यात भरदिवसा मार्केटयार्ड येथे लुटण्यात आलेली 27 लाखांच्या रोकड लुटीप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र, गेल्या वर्षात कात्रज बायपासला पेट्रोल पंपाची 25 लाखांची रोकड घेऊन जाताना वार करून दुचाकीस्वारांनी लुटले होते. त्याचा अद्याप पोलिसांना छडा लागलेला नाही. तर, शहरात पत्त्ता विचारण्याचा बहाणा तसेच दुचाकीवर येऊन महिलांच्या पर्स व नागरिकांना लुटणार्‍यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र, या घटनांचाही छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.