Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Pune › प्रेमवीरांसाठी बस थांबविली नाही; चालकाला मारहाण

प्रेमवीरांसाठी बस थांबविली नाही; चालकाला मारहाण

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:46AMपुणे : प्रतिनिधी 

प्रेमीयुगुलाला दिवेघाटात उतरायचे होते; मात्र तेथे थांबा नसल्याने चालकाने बस न थांबविल्याने प्रियकराने मित्रांना बोलावून चालकाला मारहाण करत बसची काच फोडली. बुधवारी सायंकाळी हडपसरमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत  हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

करण बापू शिरसाठ (वय 20, रा. फुरसुंगी) याच्यासह त्याच्या साथीदारांवर बसचालक रविंद्र नवनाथ लोंढे (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर ते जुन्नर जाणारी बस दिवे घाटातून पुण्याच्या दिशेने येत होती. 

करण शिरसाठ त्याच्या प्रेयसीसोबत बसमध्ये बसला होता. त्याला व त्याच्या प्रेयसीला दिवेघाटात उतरायचे होते. त्यामुळे त्याने वाहक व चालकाला दिवेघाटात बस थांबविण्यास सांगितले. परंतु, तेथे बसथांबा नसल्याने चालक लोंढे यांनी बस थांबविली नाही. बस न थांबविल्याने चालक लोंढे व करण शिरसाठ यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर करण बसमध्ये बसून होता. मात्र याचा राग मनात असल्याने त्याने त्याच्या मित्रांना फोन करून हडपसर येथे बोलवले.

त्यानंतर त्याचे मित्र हडपसर येथील उड्डाणपुलाखाली आले. त्यांनी बस हडपसर पुलाखाली गाठली आणि  अ‍ॅक्टीव्हा आडवी लावून बस थांबवली. त्यानंतर शिरसाठ आणि त्याच्या साथीदारांनी चालक लोंढे यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. यामध्ये बसची काच फोडून नुकसान केले. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.