Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Pune ›  जळीतग्रस्त आजही उघड्यावर

 जळीतग्रस्त आजही उघड्यावर

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:56AMबिबवेवाडी : अनिल दाहोत्रे

मार्केटयार्डमधील आंबेडकरनगर वसाहत येथील 74 झोपड्या जळून तब्बल पंधरा दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची ठोक मदत जळीतग्रस्तांना मिळाली नाही.  जळीतग्रस्त उघड्यावर आपला संसार करीत आहेत. महापालिका व शासनाकडून  तात्पुरती (पत्रे, लाकूड, वासे) इत्यादी मदत घेण्यास जळीतग्रस्तांनी नकार दिला आहे. परिणामी 74 जळीतग्रस्त आजही उघड्यावर संसार करत आहेत. 

आंबेडकरनगर येथे 21 एप्रिल 2018 रोजी सकाळी लागलेल्या आगीत 74 झोपड्या आगीच्या खाक झाल्या होत्या. या आगीत अनेकांचे संसार पूर्ण जाळले आहेत. चार लग्नघरातील नववधूला लागणारा संसार जळला. भांडी, कपडे, सोने, पैसा आगीत जाळून खाक झाला. काबाडकष्ट करून जगणार्‍या काही नागरिकांना एकवेळच्या अन्नाचीसुद्धा व्यवस्था करणे अवघड झाले आहे. जळालेल्या झोपड्या उभारण्याकरिता तात्पुरते मदत म्हणून महापालिकेकडून देण्यात आलेले पत्रे व बाबू घेण्यास जळीतग्रस्तांनी नकार दिला आहे. महापालिका व राज्यशासनाकडून पक्की घरे बांधून मिळण्याची मागणी येथील जळीतग्रस्त करीत आहेत. 

डोक्यावर साडी व पडद्याच्या आधाराचे छत्र, त्याच्याच खाली दगडावर चूल उभारून मिळालेल्या तुटपुंज्या मदतीने जळीतग्रस्त जगत आहेत. शासनाच्या एसआरए योजनेतून मदत कार्य होऊ शकते. त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे तहसीलदार गीता दळवी यांनी सांगितले. जळीतग्रस्तांसाठी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक मानसी देशपांडे, सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, अनुसया चव्हाण, विविध सामाजिक संस्था, सतीश मिसाळ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी पुणे शहर, ढोले पाटील प्रतिष्ठान, पवार प्रतिष्ठान, महेश सेवा संघ अश्विनी कदम, मोहिते प्रतिष्ठान, दीपक मानकर यांच्यासह विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. 

प्रभाग 36, सर्व्हे 570 मध्ये 74 नागरिकांचे नुकसान झाल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट व मंत्री दिलीप कांबळे व मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर आंबेडकरनगरमध्ये एसआरए योजनेच्या माध्यमातून जळीतग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी तात्पुरती सोय महापालिकेच्या माध्यमातून घ्यावी असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. आमदारांच्या माध्यमातून व महापालिका माध्यमातून मदतकार्य सुरू आहे. जळीतग्रस्तांना आवश्यक त्या मागणीची पूर्ण करण्याचे काम सुरू आहे, असे नगरसेविका मानसी देशपांडे व सुनील कांबळे यांनी सांगितले.