Mon, Mar 25, 2019 09:36होमपेज › Pune › म्हाडाच्या घरांची बांधकामे उच्च दर्जाची

म्हाडाच्या घरांची बांधकामे उच्च दर्जाची

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:40AMपुणे ः प्रतिनिधी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) घरांकडे सामान्य नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र, सध्या म्हाडाची घरे उच्च दर्जाची बांधली जात आहेत, असे प्रतिपादन म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे.  

म्हाडाच्या वतीने सदनिका आणि भूखंडांची नांदेड सिटीतील आय. टी. इन्क्युबेशन सेंटरमध्ये संगणकीय सोडत शनिवारी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लहाने, म्हाडाचे माजी अध्यक्ष अकुंश काकडे, नांदेड सिटीचे सतीश मगर, म्हाडाचे सचिव भारत बास्टेवाड आदी उपस्थित होते.

अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडातर्फे 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी तब्बल 43 हजार अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले होते. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर 36 हजार 99 अर्ज पात्र ठरले. 

विशेषतः सर्वात जास्त अर्ज नांदेड सिटी येथील सोडत क्रमांक 154 आणि 155 (जनरंजनी सोसायटी) या विभागासाठी म्हणजे तब्बल 10 हजार अर्ज प्राप्त झाले होते. या सोडतीसाठी विविध 84 गट निर्माण करण्यात आले होते. त्यांची टप्प्याटप्प्याने सोडत करण्यात आली. 

घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वांना परवडणार्‍या घरांचे स्वप्न साकार होत आहे. म्हाडाच्या वतीने एकाचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने पारदर्शक सोडत होत आहे. यातून गरीब व गरजू लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, याचे समाधान असून, आज ज्यांना सदनिका मिळाल्या नाहीत, त्यांनी खचून न जाता यापुढे होणार्‍या सोडतीमध्ये अर्ज करावा, असे आवाहनही समरजितसिंह घाटगे यांनी केले.

आ. भीमराव तापकीर म्हणाले, यापूर्वी म्हाडाच्या सदनिका या खासदार, आमदार आणि राजकीय लोकांच्या शिफारसीने सदनिका दिल्या जात होत्या. मात्र, राज्य सरकारने सदनिका वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन केली आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप न होता ही प्रक्रिया पार पडली आहे, असे तापकीर यांनी सांगितले.