Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Pune › अर्थसंकल्पातील तरतुदी कागदावरच

अर्थसंकल्पातील तरतुदी कागदावरच

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:46PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2018-2019 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर गुरुवारी (दि.15) स्थायी समितीला सादर करणार आहेत; मात्र पालिकेच्या सन 2017-2018 च्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी कागदावरच असल्याचे दिसत आहे. येत्या अर्थसंकल्पात करण्यात येणार्‍या तरतुदी तरी खर्ची पडणार का, असा प्रश्न केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कोणतीही करवाढ नसलेले 2017-2018 या आर्थिक वर्षासाठीचा (जेएनएनयूआरएमसह ) 4 हजार 805 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालीन पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील वर्षी स्थायी समितीस सादर केला होता. हा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपने पालिका सभेत कोणत्याही चर्चेविना मंजूर केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांनी भाजपच्या हुकूमशाहीचा निषेध करत सभात्याग केला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपच्या एकधिकारशाहीवर कडाडून टीका केली होती.

पालिकेत भाजप सत्तारूढ झाल्यानंतरच्या या पहिल्याच अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी 50 कोटी, अमृत योजनेसाठी 36.35 कोटी, ‘स्मार्ट सिटी’साठी 49.50 कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी 97 कोटी, नगररचना भू-संपादनाकरिता 137 कोटी, पीएमपीएमलसाठी 135 कोटी, पाणीपुरवठा विशेष निधी 70.50 कोटी, अपंग कल्याणकारी योजनेसाठी 20.42 कोटी, महिलांच्या  कल्याणकारी योजनांसाठी 48.32 कोटी तरतूद केली होती.  मागासवर्गीय योजनांसाठी 53.77 कोटी, क्रीडा निधीसाठी 33.63 कोटींची  तरतूद करण्यात आली होती.

पालिकेच्या जलनिस्सारण विभागासाठी 97 कोटी, पालिकेत समाविष्ट गावांत 32.11 किलोमीटर, तर झोपडपट्टी क्षेत्रात 14.27 किलोमीटर नवीन जलनिस्सारण नलिका टाकणे, चिंचवडगाव व थेरगाव यांना जोडणार्‍या पवना नदीवर 28 कोटींचा ‘बटर फ्लाय’ ब्रीज, चिंचवडगाव येथे 50 लाखांचे दुमजली वाहनतळ, भोसरी येथे 12.5 कोटींचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारणे, अण्णासाहेब मगर स्टेडियम, बालेवाडी क्रीडानगरीच्या धर्तीवर अद्ययावत करणे, अजमेरा कॉलनी, थेरगाव आणि आकुर्डी येथे सुसज्ज रुग्णालय उभारणे, थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवचरित्रावर आधारित ‘म्युरल्स’ उभारणे, बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आणि सखूबाई गवळी उद्यानात रंगीत कारंजे, मासूळकर कॉलनी व खराळवाडी येथे मोठी उद्याने, रावेत येथे बास्केट ब्रीजला लागून नवीन बंधारा बांधणे, आंद्रा-भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न, चिखली व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण केंद्र, आदी कामांसाठी अर्थसंकल्पात तरतुदी होत्या. यातील अनेक कामे; तसेच  रावेत बास्केट ब्रीजला लागून नवीन बंधारा बांधणे, संभाजीनगर येथे 93 कोटींचे बस टर्मिनस उभारणे, ही कामेही कागदावरच आहेत. 

आंद्रा-भामा-आसखेड धरणामधून 267 एलएलडी पाणी आणण्याचा प्रकल्प हाती घेण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती त्यासाठी 10 कोटींची तरतूद होती; मात्र हा प्रकल्प रखडला. अजमेरा, पिंपरी येथे अद्ययावत नेत्र रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र (अर्बन हेल्थ सेंटर)चे नियोजन केले होते. त्याचा बांधकाम नकाशा मंजूर झाला; मात्र पुढे कार्यवाही झाली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चर्‍होली येथे 1442, डुडुळगाव येथे 950, रावेत येथे 1080 घरे बांधण्याची घोषणा झाली, त्याची निविदा कार्यवाही आता कुठे अंतिम टप्प्यात आहे. 

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत नेटवर्क, वायफाय, व्हिजन प्लॅन, घनकचरा व्यवस्थापन यासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता; मात्र शासनाकडून एक रुपयाही त्यासाठी आला नाही .इंद्रायणीनगर व चर्‍होली येथील तलावाचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही तसेच रावेत बंधार्‍यासाठी 30 ते 35 कोटी खर्च अपेक्षित धरून 5 कोटींची तरतूद केली मात्र तेही काम अद्याप कागदावरच आहे.