Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Pune › चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे ‘बजेट’ ताळमेळ नसल्याने वाढले

चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे ‘बजेट’ ताळमेळ नसल्याने वाढले

Published On: Mar 01 2018 1:53AM | Last Updated: Mar 01 2018 1:51AMपुणे : प्रतिनिधी

भूसंपादन झाले नसतानाही चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे प्रसिद्धीसाठी उद्घाटन करण्यात आले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा ताळमेळ नसल्यामुळे या पुलाचे बजेट 151 कोटी रुपयांनी वाढले आहे. सत्ताधार्‍यांनी या उड्डाणपुलाचे काम केव्हा सुरू होणार आहे आणि केव्हा पूर्ण होणार आहे हे सांगावे, अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशारा माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.  

चांदणी चौकात उड्डाणपूल व्हावा यासाठी 2013 पासून पाठपुरावा केला जात आहे. त्यावेळी प्रशासनाने प्राथमिक विकासकामांना प्रारंभ करत रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरण केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांना या समस्येबाबत निवेदन पाठविल्यानंतर केंद्राने 10 सप्टेंबर 2015 रोजी चांदणी चौक दुमजली पुलासाठी 200 कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी गडकरी यांच्या हस्ते या नियोजित उड्डाणपुलाचे आणि विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले.  उद्घाटनानंतर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. 
माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, या पुलासाठी 15.13 हेक्टर भूसंपादनाची गरज असून, त्यापैकी फक्त 1.90 हेक्टर क्षेत्र ताब्यात आले आहे. अजून 13.23 हेक्टर जागा ताब्यात नाही. तर पुलाचा खर्च 200 कोटींवरून 371.98 कोटींवर पोहचला आहे. 

दुसरीकडे भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास सदर प्रकल्पाचे काम रद्द करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेला लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे सदरचा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाचे काम लवकर सुरू करावे, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जाईल, असा इशाराही गोरडे यांनी दिला.