Sat, Apr 20, 2019 09:57होमपेज › Pune › नोकरीच्या आमिषाने कोटींचा गंडा

नोकरीच्या आमिषाने कोटींचा गंडा

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी 

वैद्यकीय शिक्षण खात्यात विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील सातशे ते आठशे युवकांची सुमारे तीस कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भारतीय जनता पक्षाचा नवी मुंबईचा महामंत्री जितेंद्र बंडू भोसले असल्याचा आरोप उमेदवारांच्या वतीने ‘माजी सैनिक विकास परिषद’चे अध्यक्ष सुधाकरन पणीकर यांनी केला आहे. 

तरुणांचा विश्‍वास पटण्यासाठी काही उमेदवारांच्या पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय या ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. विद्यालयाच्या सूचना फलकावर उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करून एका उमेदवाराकडून तीन लाख ते 15 लाख रुपये घेऊन त्यांना बोगस नियुक्तीपत्रही देण्यात आले. जेव्हा हे तरुण-तरुणी नियुक्‍तीपत्रघेऊन संबंधित विद्यालय, रुग्णालयात गेले तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे आढळून आले, असे ‘माजी सैनिक विकास परिषद’चे अध्यक्ष सुधाकरन पणीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी फसवणूक झालेल्या उमेदवार सारिका चव्हाण, मधुकर भाकरे आदी उपस्थित होते. 

राज्यभराची व्याप्ती असलेल्या या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील 16 महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, इलेक्ट्रिशियन अशा विविध पदांसाठी जागा सुटल्याचे या उमेदवारांना या रॅकेटमधील एजंटांनी सांगितले. त्यांना खरे वाटावे म्हणून राज्य शासनाचे 18 जुलै 2016 चे नोकरी संदर्भातले परिपत्रक दाखवले; तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे (डीएमईआर) मंत्री गिरीश महाजन यांच्या सहीचे लेटरहेड, ‘डीएमईआर’ चे संचालक प्रवीण शिनगारे यांच्या सहींचे परिपत्रक दाखवून उमेदवारांचा विश्‍वास संपादन करण्यात आला. हा प्रकार 2016 पासून 2018 च्या दरम्यान घडला आहे. यामध्ये बीड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, सोलापूर येथील जास्त उमेदवारांची फसवणूक झाली आहे. 
ससूनमध्ये झाल्या मुलाखती

विविध पदांवर नोकरी लावतो असे सांगून भोसले व त्यांच्या साथीदारांनी या विद्यार्थ्यांना पुण्यात बोलावले. त्यांना विश्वास बसावा यासाठी जून 2017 मध्ये ससून रुग्णालयाच्या एका छोट्याशा कार्यालयामध्ये त्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर नोकरीस पात्र उमेदवारांची यादी लावली. या वेळी कागदपत्रावर भोसले यांनी ‘डीएमईआर’चा शिक्का देखील वापरल्याचे पणीकर यांनी सांगितले; मात्र येथे किती विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले हे स्पष्ट नाही.  लाखोंची फसवणूकयादी लावल्यानंतर  तुमचे अर्धे काम झाल्याचे सांगून त्यांच्याकडून तीन ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम उकळली. त्यांना दोन महिन्यांनी ऑगस्ट 2017 मध्ये नियुक्तीपत्र दिले. यानंतर काही दिवस भोसले यांनी या उमेदवारांना संपर्क केला नाही. उमेदवारांनी भोसले व एजंटांना फोन केला असता भोसले यांनी सध्या मंत्री व्यस्त आहेत, अधिकारी रजेवर आहेत असे थातूर-मातूर कारणे सांगून वेळ मारून नेली.

उमेदवारांना केली मारहाणकाही उमेदवार वैतागून भोसले यांच्याकडे मुंबईला गेले असता त्यातील भोकरे या उमेदवाराच्या नातेवाईकाला भोसले यांनी पैसे परत देतो, असे सांगून गाडीत बसवून नेले. यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन जिवे मारण्याचा दम दिला. तर काहींना पैसे परत देतो असे बंद खात्याचे धनादेश दिले, असा आरोप पणीकर यांनी केला आहे.ससूनने आरोप फेटाळले   याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाल यांनी विचारणा केली असता त्यांनी या केसमध्ये ससूनच्या कोणत्याही अधिकार्‍याचा संबंध नसल्याचे सांगितले; तसेच गेल्यावर्षी जुलै महिन्यात एक उमेदवार बोगस नियुक्‍तीपत्र घेऊन वैद्यकीय महाविद्यालयात आला. त्याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तसेच याचा अहवाल ‘डीएमईआर’ला कळविण्यात आला आहे. तसेच त्याचवेळी विद्यालयाच्या नोटीस बोर्डवर उमेदवारांची यादी लावली होती ती लगेच काढून टाकली. मुलाखती ससूनच्या आवारात झाल्याचे आरोपही डॉ. चंदनवाले यांनी फेटाळून लावले.  पोलिस आयुक्‍तांना निवेदनयाबाबत पुण्याचे पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्ला यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. आयुक्‍त शुक्‍ला यांनी या प्रकरणाची चौकशी सह आयुक्‍तांकडे सोपवली आहे. तसेच याबाबत शुक्रवारी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
 

सुधाकर पणीकर, अध्यक्ष, माजी सैनिक विकास परिषद रामदास शिंदे यांच्या मध्यस्थीने जितेंद्र भोसले यांची ओळख झाली. भोसले यांनी वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात नोकरी लावून देतो, असे सांगून तीन लाख रुपये घेतले. परंतु यानंतर वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी टाळाटाळ केली.  

   - सारिका चव्हाण, उस्मानाबाद, फसवणूक झालेली उमेदवार
फोटो - 8 कलर 30
फोटो ओळ-  वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नोकरीच्या आमिषाने उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना ‘माजी सैनिक विकास परिषद’चे पदाधिकारी व इतर.