होमपेज › Pune › ईपीएफओचा लाचखोर अधिकारी जाळ्यात 

ईपीएफओचा लाचखोर अधिकारी जाळ्यात 

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी 

आकुर्डी येथील ईपीएफओच्या अंमलबजावणी अधिकार्‍याला 20 हजार रुपयांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी अटक केली. अविनाश बन्सी पत्रा असे पकडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. 

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अविनाश पत्रा हा आकुर्डी येथील ईपीएफओच्या कार्यालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. तक्रारदार हे वेगवेगळ्या कंपन्या, हॉटेल्समध्ये असलेल्या आलिशान बगिच्यांची देखभाल करण्याची कामे घेतात, तर पात्रा हा एका मोठ्या हॉटेलच्या पीएफचे ऑडिट करण्यासाठी गेला होता. त्या हॉटेलच्या बागेच्या देखभालीचे काम तक्रारदार यांनी करण्यास घेतले होते.

तेथे काम सुरू असताना पत्रा याने तेथील व्यक्तींना त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी तक्रारदार हे काम करत असल्याचे तेथील व्यक्तींनी पात्रा याला सांगितले. त्यानंतर पात्रा याने तक्रारदार यांनाच 25 हजार रुपयांची मागणी करत ते न दिल्यास पीएफच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी सापळा रचून सीबीआयच्या अधिकार्‍यांनी पात्रा याला 20 हजारांची लाच घेताना पकडले. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.