Mon, Jun 17, 2019 04:21होमपेज › Pune › लाचखोर पोलिस शिपाई जाळ्यात 

लाचखोर पोलिस शिपाई जाळ्यात 

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:54AMपुणे : प्रतिनिधी

शहर पोलिस दलातील कोंढवा पोलिस ठाण्यातल्या पोलिस शिपाई वैभव चंद्रकांत बनकर (वय 28)  याला हॉटेल व्यावसायिकाकडून 8 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले. शनिवारी रात्री ही कारवाई हॉटेलमध्ये करण्यात आली.  काही महिन्यांपूर्वीच कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर आणखी एका कर्मचार्‍याला पकडण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वैभव बनकर हा कोंढवा पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. यातील तक्रारदाराचे कोंढव्यातील महम्मदवाडी परिसरातल्या कड चौकात हॉटेल आहे.  हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्यास रात्री हॉटेल बंद करण्यास उशीर होतो.

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते. तक्रारदारांचे हॉटेल उशिरापर्यंत सुरू असताना त्यावर कारवाई न करण्यासाठी वैभव बनकर याने 8 हजाराची लाच हॉटेल मालकाकडे मागितली होती. त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीकडून या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या पथकाने शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. तसेच, तक्रारदार यांच्याकडून वैभव बनकर याला हॉटेलमध्ये 8 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. 

गेल्या महिन्यांमध्ये पुणे पोलिस दलातील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना पैसे घेताना रंगेहात पकडल्याची काही प्रकरण समोर आले आहेत. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. 
दरम्यान, गेल्या आठवड्यातच वाहतूक कर्मचार्‍याला वाहन चालकाकाडून 700 रुपयांची लाच घेताना पकडले होते. तर, कोंढवा पोलिस ठाण्यातीलच महिला उपनिरीक्षकासह एका कर्मचार्‍याला 15 हजाराची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते.