Mon, Mar 25, 2019 18:04होमपेज › Pune › पोत्यात घातलेला महिलेचा मृतदेह सापडला

पोत्यात घातलेला महिलेचा मृतदेह सापडला

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

मुळा-मुठा नदीपात्रातील पूना हॉस्पिटल परिसरात महिलेचा खून करून तिचे हात-पाय बांधत मृतदेह पोत्यात टाकू न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी मृतदेह टाकण्यात आला असावा, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापयर्र्ंत सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मुळा-मुठा नदीपात्रातील पूना हॉस्पिटल भागात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. डेक्‍कन पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अग्निशामक दल जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी एका महिलेचे दोन्ही हात-पाय पाठीमागे बांधलेले व मृतदेह पोत्यात घातलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. महिलेचे वय 30 ते 35 वर्षे असून, तिच्या शरीरावर तसेच डोक्यावर वार केलेले आहेत. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, तो काही दिवसांपूर्वी नदीत टाकण्यात आला असावा, अशी शक्यता आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेह आढळल्याची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरल्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती. महिलेने निळसर कुर्ता आणि चॉकलेटी रंगाची लेगिन्स परिधान केलेली आहे. हातात घड्याळ तसेच पायात सँडलही आहेत. तिच्या डाव्या हातावर संजय असे मराठीत गोंदलेले आहे. तिचे हात-पाय बांधलेले होते. त्यामुळे तिचा खून केल्याचे निदर्शनास येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या हरवलेल्या महिलांची माहिती पडताळून पाहिली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत, असे डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले.