Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Pune › बेपत्ता डॉक्टरचा मृतदेह सापडला

बेपत्ता डॉक्टरचा मृतदेह सापडला

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 12:03AMपुणे : प्रतिनिधी 

धायरी परिसरातून बेपत्ता असलेल्या डॉक्टरचा मृतदेह खडकवासला धरणाजवळ त्यांच्याच कारमध्ये शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गस्तीवर असलेल्या हवेली पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळून आला. डॉक्टर गुरुवारपासून घरातून बेपत्ता असल्याबाबत त्यांच्या पत्नीने ‘मिसिंग’ची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी त्यांच्या एका मित्राला हवेली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 
डॉ. किशोर देवीदास शेडगे (47, रायकरनगर, धायरी) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्या पत्नी श्रद्धा शेडगे यांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर किशोर शेडगे हे धायरी परिसरात पशुवैद्यकीय  डॉक्टर म्हणून काम करत होते.  कुटुंबासह धायरी येथील रायकरनगर परिसरात राहण्यास होते. दरम्यान, गुुरुवारी दुपारी दीड वाजता ते बाहेर जात असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीसोबत निघून गेले. त्यानंतर ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नी श्रद्धा यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर शनिवारी रात्री हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वायकर व सहायक पोलिस उपनिरीक्षक गायकवाड आणि इतर कर्मचारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

त्यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना खडकवासला धरणाजवळच्या चौपाटीपासून थोड्या अंतरावर पुढे एक पांढर्‍या रंगाची हुंदाई क्रेटा कार उभी असलेली आढळून आली. त्यानंतर त्यांनी कार येथे का उभी आहे, याची शहानिशा करण्यासाठी कारजवळ गेले; मात्र कारमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कारचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. कार लॉक केलेली नव्हती. दार उघडून आत पाहिल्यावर पोलिसांना मागील आसनावर एका व्यक्तीचे पाय बाहेर दिसले. त्यानंतर त्यांनी आत पाहणी केल्यावर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत दिसून आली. पोलिसांनी तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्सला पाचारण केले. अ‍ॅम्ब्युलन्स आल्यानंतर त्यातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.  

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले; तसेच कारमध्ये काही कागदपत्रे पडलेली पोलिसांना दिसून आली.  पोलिसांनी क्रेटा कारच्या क्रमांकावरून कार मालकाचे नाव शोधले. त्यावेळी ती कार डॉ. किशोर शेडगे यांची असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केल्यावर ते दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी डॉ. शेडगे यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला असून, शवविच्छेदनानंतर त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले. ते शुक्रवारी सिंहगड रोड, धायरी तसेच महामार्ग परिसरात गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.  पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.