होमपेज › Pune › मजूर महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला

मजूर महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला

By | Publish Date: Jul 21 2017 3:08PM

मंचर : प्रतिनिधी

वडगांवपीर  (ता. आंबेगाव जि. पुणे)  येथे विहीर खोदाईच्या कामासाठी बाहेरून आलेली विवाहिता लक्ष्मी संतोष शिंदे (वय २१) हिचा मृतदेह नजीकच्या विहिरीत सापडला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी हिच्या मृत्युचे कारण  समजले नसल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले.

टेंभेअंतरोली( ता.घणसांगवी, जि. जालना ) येथून विहीर खोदाईच्या कामासाठी गंगाराम पांडोबा शिंदे  हे आपल्या कुटूंबियांसह वडगांवपीर येथे आले आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे सर्वानी जेवण करून झोपी गेले. यावेळी त्यांचे नऊ महिन्याचे लहान बाळही झोपी गेले. रविवारी सकाळी लहान बाळ रडू लागल्याने वडील संतोष यांना जाग आली, मात्र त्यांची पत्‍नी लक्ष्मी तिथे नसल्याचे लक्षात आले. यावेळी परिसरातील लोकांनी तिचा शोध घेतला. यावेळी जवळच असणार्‍या विहिरीत नागरिकांनी लोखंडी गळ टाकून शोधमोहिम चालू केली, तेव्‍हा लक्ष्मीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद मंचर पोलिसात झाली आहे.