Sun, May 26, 2019 12:59होमपेज › Pune › होर्डिंग अंगावर पडून मृत्यूस पालिकेचा हलगर्जीपणा  जबाबदार

होर्डिंग अंगावर पडून मृत्यूस पालिकेचा हलगर्जीपणा  जबाबदार

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:40AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.1) झालेल्या वादळी वार्‍यामुळे मोशी व पुनावळे येथील लोखंडी होर्डिंग अंगावर पडून दोघा निष्पाप व्यक्तींचा हकनाक बळी गेला. निव्वळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बेजाबदारपणामुळे हा प्रकार घडला आहे. पालिकेचे नियम धाब्यावर बसवून आकारापेक्षा जास्त आणि अधिक वजनाचे लोखंडी सांगाडे बनवून होर्डिंग्ज गल्ली-बोळात लावले जात आहेत. त्यातून लाखो रूपयांची कमाई केली जाते. त्यावर पालिका प्रशासनाचा अंकुश नसल्याने कोठेही बेकायदेशीपणे होर्डिंग उभारले जात आहेत. पुन्हा वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस झाल्यास अशा घटनांची पुर्नरावृत्ती घडण्याची दाट शक्यता आहे. 

जाहिरातीच्या माध्यमातून होर्डींग मालक आणि जाहिरात एजन्सींना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. त्याबद्दलात नाममात्र शुल्क पालिकेस भरावे लागते. वर्षांला लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचे होर्डिंग हे साधन झाले आहे. त्यामुळे जागा व इमारत मालक भल्या मोठ्या आकाराचे लोखंडी होर्डिंग उभे करतात. त्यावर विविध कंपन्या व वस्तूंचे मोठ-मोठ्या जाहिराती लावल्या जातात. त्यातून दरमहिन्यास निश्‍चित उत्पन्न मिळत असल्याने वर्दळीच्या ठिकाणासह गल्लोबोळात होर्डींग लावले गेले आहेत. 

त्यावर पालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाचा कोणत्याही अंकुश नसल्याचे स्पष्ट होते. जाहिरात एजन्सीकडे जाहिरातीसाठी लाखो रूपये भाडे आकारात. त्यातून अनेक एजन्सी गब्बर झाल्या आहेत. मात्र, पालिकेकडे नाममात्र शुल्क भरून परवाना घेतला जातो. तर, अनेक ठिकाणचे होर्डिंगचे विनापरवानाच उभारलेले केले आहेत. ही संख्या मोठी असल्याचा आरोप पालिका सभागृहात लोकप्रतिनिधींनी अनेकदा केला  आहे. 

या संदर्भात वारंवार तक्रारी करून पालिका प्रशासन दखल घेत नाही. प्रशासन व जाहिरात एजन्सींमध्ये ‘आर्थिक’ लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. बरेच होर्डिंगना चुकीच्या पद्धतीने नियमात बसून परवानगी देण्यात आलेली आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. 

दरम्यान, शुक्रवारी (दि.1) झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागाचे नुकसान झाले. मोशी, चिखली, चर्होली, पुनावळे, ताथवडे या परिसरामध्ये वादळी पावसाने रस्त्यावरील अनेक होर्डिंग कोसळले. त्यामध्ये पत्राशेड, छोटी दुकाने, वाहने, टपर्‍या आदींचे नुकसान झाले. मोशी येथील नंदू शहा व पुनावळे येथील कांताबाई भारती या निष्पाप व्यक्तींचा लोखंडी होर्डिंग पडून जागीच मृत्यू झाला. 

परिसरातील बहुतांश होर्डिंग बेकादेशीर असून, महापालिकेच्या नियमात ती बसत नाहीत.  सदर होर्डिंग हे आकार व वजनामध्ये अधिक आहेत. शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतुकीसला अडथळा निर्माण होईल, असे होर्डिंग उभे केलेले आहेत. अनधिकृत इमारतींवर देखील होर्डिंग लावले गेले आहेत. त्यामुळे शहर बकाल झाले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत होर्डिंगमुळे पावसाळ्याच्या काळात मोठी जीवित हानी होण्याचा धोका आहे, असा आरोप  शिवसेनेने केला आहे. शहरातील सर्व होर्डिंगचा पंचनामा संबंधितांवर कारवाई करावी. पालिका प्रशासनच्या हलगर्जीपणामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्या प्रकरणी प्रशासनाला जबाबदार धरून, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर सदोष मनुष्यवधनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने शहरप्रमुख योगेश बाबर यांनी पोलिसांकडे केली आहे. 

बेकायदा जाहिरात फलकांविरोधात भाजप नगरसेवकही

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग, फलक व फ्लेक्सवर कारवाई करावी, अशी सक्त सूचना स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा साळवे यांनी आकाशचिन्ह परवाना विभागास केली होती. तसेच, पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक काढून पालिका भवनासमोर टाकण्याचे आंदोलन भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केले होते. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनीही अनधिकृत होर्डिंग व फलकावर कारवाई करून दंड वसुल करावा, नियमात बसत असलेल्या होर्डिंगकडून रितसर शुल्क आकारून परवानगी द्यावी. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढेल, अशा सूचना पूर्वीच दिल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून संथ गतीने कारवाई सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे.