Wed, Jan 16, 2019 05:31होमपेज › Pune › ‘बायोमेट्रिक’ मशिन अडगळीत

‘बायोमेट्रिक’ मशिन अडगळीत

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

डेक्कन येथील रेल्वे आरक्षण केंद्रात बसविण्यात आलेली दोन बायोमेट्रिक मशिन काढून टाकण्यात आली असून, ती अडगळीत ठेवण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही बायोमेट्रिक टोकन डिस्पॅचर मशिन बंद होती. ती दुरुस्त करणे अपेक्षित असताना मशिन्सच अडगळीत टाकण्यात आल्याने नागरिकांच्या पैशांचा चुराडा झाला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी ही मशिन काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. 

जुलै 2015 मध्ये पुणे रेल्वे स्थानकावर दोन मशिन सर्वप्रथम बसविण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डेक्कन, चिंचवड, खडकी, मिरज, कोल्हापूर येथे ती बसविण्यात आली. पुणे स्थानकावर बसविण्यात आलेली बायोमेट्रिक मशिन सुरू असून, अन्य ठिकाणची मशिन मात्र बंद आहेत. मशिन जेव्हापासून बसविण्यात आली तेव्हापासून त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती सुरूच होऊ शकली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. भोपाळ येथील मायक्रो इंटिग्रेटेड सेमी-सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दहा बायोमेट्रिक मशिन बनवली असून, ती सर्व सदोष असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. प्रत्येक मशिनची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. 

दरम्यान, पुणे विभागाने दोन वर्षांपूर्वी सुमारे तीस लाख रुपयांची बायोमेट्रिक मशिन्स विकत घेतली आहेत. देखभाल दुरुस्तीचा प्रतिमशिन वार्षिक खर्च सुमारे 19 हजार रुपये असून, बायोमेट्रिक मशिन खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे, असा आरोप अ‍ॅड. आशुतोष रानडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.