Fri, Mar 22, 2019 22:50होमपेज › Pune › लाभार्थ्यांनी दिल्या जीएसटीच्या बनावट पावत्या

लाभार्थ्यांनी दिल्या जीएसटीच्या बनावट पावत्या

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:30AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण योजनेतंर्गत शिलाई यंत्र देण्याची योजना आहे. मात्र, त्यासाठी काही लाभार्थ्यांनी बनावट जीएसटी पावती सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, अशा लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करणे सोडून, त्यांना अस्सल पावती सादर करण्याचे आवाहन करून पालिका प्रशासन त्यांना अभय देत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या कृतीतून पालिका आर्थिक गैरव्यवहाराला चालना देत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 6 हजार रूपये अनुदान दिले जाते. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी लाभार्थ्यांनी प्रथम शिलाई यंत्र खरेदी करून त्याची जीएसटीची अस्सल पावती नागरवस्ती योजना विभागात स्वीकारण्यात येत आहे. ही पावती दिल्यानंतरच प्रत्यक्ष लाभ दिला जातो. सदर 6 हजार रूपये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा केली जाते. 

मात्र, अर्ज तपासणीमध्ये समुह संघटकांना काही पावत्या बनावट असल्याचे आढळून आल्या आहेत. प्रत्यक्षात शिलाई यंत्र खरेदी न करता दुकानदारांचा बनावट पावत्या बनवून त्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शिलाई यंत्राची खरेदीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थी शिलाई यंत्र खरेदी न करता केवळ 6 हजार रूपयांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. पालिका प्रशासनाची फसवणूक करणार्‍या अशा लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करणे अपेक्षित असताना, पालिका प्रशासन त्यांना अभय देत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष शिलाई यंत्र खरेदी करुन, जीएसटीची अस्सल पावती नागरवस्ती विकास योजना विभागास सादर करावी, असे अजब आवाहन करण्यात आले आहे. जीएसटी क्रमांक बरोबर असल्याची दुकानदारांकडून खात्री करुन घ्यावी. अन्यथा लाभार्थी महिलांना शिलाई यंत्राचे अर्थसहाय दिले जाणार नाही, असे नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले; मात्र संबंधित कर्मचारी गैरहजर असल्याने बनावट पावत्या देणार्‍या महिलांची संख्या सांगण्यास त्यांनी नकार दिला.   

यादीतील लाभार्थ्यांना सूचना

पहिल्या यादीसाठी अस्सल जीएसटी पावती सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती. दुसर्‍या यादीतील लाभार्थ्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अपूर्ण कागदपत्रे सादर केलेल्या यादीतील अपात्र 3 हजार 200 लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. लाभार्थी महिलांनी मुदतीमध्ये अस्सल जीएसटी पावती आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. तसेच, बँक बचत खात्याचा योग्य क्रमांक द्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.