होमपेज › Pune › राज्यात भिकार्‍यांचे  करणार पुनर्वसन

राज्यात भिकार्‍यांचे  करणार पुनर्वसन

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील सर्व भिका-यांचे पुनर्वसन करण्याचा संकल्प धर्मादाय आयुक्‍तालयाने केला आहे. येत्या एक मार्चपासून त्याची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी पोलीस, महिला बालकल्याण आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयाने हे काम केले जाणार आहे. यामधून राज्यातील सुमारे 50 हजार भिका-यांचे विविध योजनांद्वारे संस्थांच्या मदतीने पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती धर्मादाय आयुक्‍त शिवकु मार डिगे यांनी दिली. 

राज्यात सुमारे आठ लाख धर्मादाय संस्था आहेत. यामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था आणि एनजीओ यांचा समावेश होतो. ‘बीपीटी अ‍ॅक्ट 1949’ च्या 9 या कलमान्वये प्रत्येक धर्मादाय संस्थेचा उददेश हा समाजातील वंचित व गरीब वर्गाचे दारिद्र दुर करणे, त्यांचे राहणीमान उंचावणे हा आहे. मग हा समाजातील सर्वात वंचित घटक हा भिकारी असून त्यांचे पुनर्वसन करणे ही सर्व संस्थांची जबाबदारी आहे. धर्मादायकडे नोंदणी झालेल्या संस्थांची संख्या पाहता ही संस्थांची खुप मोठी ताकद आहे. म्हणून याचाच सकारात्मक वापर करण्याचे धर्मादायने आयुक्‍तालयाने ठरवले आहे.

त्यासंदर्भात मुंबईमध्ये दोन वेळा पोलीस आयुक्‍तालय, महिला बाल कल्याण आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठका झाल्या आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातही बैठक होणार असून यामध्ये या अभियानाची रुपरेषा ठरविली जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाची भुमिका ही सामाजिक संस्थांची असून त्यांनी त्यांच्या आसपासच्या भिका-यांची जबाबदारी घेउन त्यांचे पूनर्वसन कसे करता येईल याबाबत काम करणे आवशक आहेे.

वयोगटानुसार होणार विभागणी

एक ते 18 वयोगटातील भिका-यांची मुक्‍तता करून त्यांना निवारा आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संस्था मदत करतील. 18 ते 60 या वयोगटातील काम करण्याची क्षमता असणा-या भिका-यांना कामासाठी प्रवृत्‍त केले जाउन त्यांना उदयोजकांकडे कामासाठी पाठविण्यात येणार आहे. तर 60 वर्षाच्या पुढील भिका-यांना विविध संस्थांच्या अनाथाश्रमात टाकण्यात येणार आहे. तर या तीनही गटात जी भिकारी तयार होणार नाही त्यांच्यावर भिक्षेकरी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. 

हे आहे आव्हान

भिका-यांचे पुनर्वसन करण्यात सर्वात महत्वाचे आव्हान आहे त्यांची मानसिकता बदलने. कारण काही न करता भीक मागुन त्यांना आयते पैसे मिळत असल्याने किंवा परिस्थितीपुढे हतबल होउन बहुतांश भिकारी हा भीक मागण्याचा ‘धंदा’ सोडण्यास तयार नसतात. पण त्यांना भीक मागण्यापासून परावृत्‍त करण्यासाठी  सामाजिक  त्यांच्या जवळील भिका-यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संस्थांना पत्र पाठवून अवगत करण्यात येणार आहे.  त्यासाठी  ‘एसबीआय पेन्शनर्स’ ही संस्था पुढे आली आहे.