होमपेज › Pune › मेट्रोमुळे पालिका भवनाची गेली रया

मेट्रोमुळे पालिका भवनाची गेली रया

Last Updated: Feb 25 2020 1:45AM
पिंपरी : मिलिंद कांबळे
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरच मेट्रोची मार्गिका उभारण्यात आली. त्यामुळे इमारत झाकली जाऊन पालिका भवनाच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. पालिका भवनासमोर उड्डाणपूल बांधल्याने भवनाच्या सौंदर्यास अडथळा निर्माण होईल, असे सन 2004 मध्ये ओरडून सांगणारे अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळी आता कुठे गायब झाले आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

मुंबईच्या धर्तीवर पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतराचा रस्ता 180 फूट रूंद करून ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे 2004 मध्ये नियोजन होते. उड्डाणपुलामुळे पालिका भवनाच्या  सौंदर्यास बाधा पोहोचेल, असे सांगत तत्कालीन अधिकारी व नेतेमंडळींनी उड्डाणपुलास विरोध केला होता. नाईलास्तव या मार्गावर ग्रेडसेपरेटर बांधण्यात आले. हे काम 2008-09 मध्ये पूर्ण झाले. कमी उंचीच्या या ग्रेडसेपरेटरमधून अधिक उंचीचे ट्रक व कंटेनर अडकून पडत असल्याचे चित्र नेहमी दिसून येते. 

शहरात दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोची मार्गिका उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालिका भवनासमोर सेवा रस्त्यावर मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे; मात्र मेट्रो मार्गिकेच्या उभारणीमुळे पालिकेची इमारत काही प्रमाणात झाकली गेली आहे. परिणामी, इमारत दर्शनी भागातून पूर्णपणे दृष्टीस पडत नाही. इमारतीच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. तसेच, इमारतीच्या शेजारीच पिंपरी मेट्रो स्टेशन बांधण्यात येत आहे. हे स्टेशन 160 मीटर लांब व 12 मीटर रूंद असे मोठ्या आकाराचे आहे. स्टेशनमुळे पालिका इमारत मोरवाडीच्या बाजूने पूर्णपणे झाकली जाणार आहे. त्या संदर्भात पूर्वी विरोध करणारी ती मंडळी गप्प का बसली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नवीन प्रशासकीय इमारतीस ४ वर्षांचा कालावधी 
सध्याचे पालिका भवन अपुरे पडत असल्याने गांधीनगर, पिंपरी येथे 9 मजली प्रशासकीय इमारत बांधण्याची निविदा पालिका राबवित आहे. त्या जागेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केल्याने या इमारतीसाठी दुसर्‍या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. नवी इमारत उभी राहण्यास 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. नव्या इमारतीमध्ये पालिकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सध्याची इमारत भाडे तत्वावर दिली जाणार आहे. त्यानंतर या इमारतीचे महत्व कमी होणार आहे. 

अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याचे स्थानांतर
पालिका भवनासमोरील रस्ता रूंदीकरणात अण्णासाहेब मगर यांचा पुतळ्याचे स्थानांतर करण्यात येणार आहे. या जागेत भूमिगत पार्किंग विकसित केले जाणार आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांना मेट्रो स्टेशनवर ये-जा करण्यासाठी पालिकेच्या आवारात जिना व लिफ्टची सोय असणार आहे. तसेच, शेजारच्या चौकातील अहल्यादेवी होळकर यांच्याही पुतळ्याचे स्थानांतर करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ही सर्व कामे महामेट्रो करून देणार आहे. 

मेट्रोमुळे पालिका भवनाच्या सौंदर्यात भर पडेल : विजय भोजने
मेट्रो ही झपाट्याने वाढणार्‍या पिंपरी-चिंचवड शहराची गरज आहे. त्यामुळे नागरिकांची सार्वजनिक वाहतुकीची सोय उपलब्ध होणे ही अत्यावश्यक बाब आहे. मेट्रो मार्गिकेचा आधार घेत पालिका भवनाचे आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहराच्या सौदर्यात अधिक भर पडेल, असा दावा पालिकेच्या स्थापत्य बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी केला आहे.