Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Pune › बँक मॅनेजरला डोक्यात दगड घालून लुटले

बँक मॅनेजरला डोक्यात दगड घालून लुटले

Published On: Jun 18 2018 1:20AM | Last Updated: Jun 18 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड परिसरात  बँकेच्या मॅनेजरला तिघांनी मध्यरात्री अडवून डोक्यात दगड घालून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पायी घरी निघाल्यानंतर अंधारात त्यांना लुटण्यात आले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अलोक अशोक अभंग (वय 37, रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरूड परिसरातील अमेया आर्केड भागात राहण्यास आहेत. दरम्यान ते मुंबईतील एका खासगी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. शनिवारी मध्यरात्री मुंबईवरून ते बसने पुण्यात आले होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावरील डुक्करखिंडीत उतरले. तेथून ते घरी पायी चालत येत होते. त्यावेळी ते अमेया आर्केड येथील महात्मा सोसायटी येथे आल्यानंतर अचानक तिघांनी त्यांना अडविले. त्यांना धमकावण्यास सुरूवात केली. तसेच, त्यांच्या डोक्यात दगड घालून खिशातील मोबाईल, एटीएम कार्ड, रोकड, के्र डीट कार्ड असा एकूण साडे तीन हजार रुपयांचा माल चोरून नेला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलिसांकडून रेकॉर्डवरील सराईतांची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जाखडे हे करत आहेत.