Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Pune › आयुक्‍तांनी मागितली विरोधी पक्षनेत्यांची दिलगिरी

आयुक्‍तांनी मागितली विरोधी पक्षनेत्यांची दिलगिरी

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 1:05AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विरोधी पक्षनेत्यांबद्दलचे वक्तत्व हे अपमानास्पद असल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी डोक्याला काळ्या फिती लावून आयुक्तांचा निषेध केला. त्याबाबत खुलासा करताना आयुक्तांनी सभागृह व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची दिलगिरी व्यक्त केली. तसेच, भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांचाही तीव्र निषेध करण्यात आला. 

पालिकेच्या गुरुवारी (दि.6) झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सभेच्या सुरुवातीलाच आ. राम कदम यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्‍तव्याचा राष्ट्रवादी व शिवेसेने निषेध नोंदविला. तसेच, स्मार्ट सिटी बैठकीत आयुक्तांनी वापरलेल्या शब्दामुळे विरोधी पक्षनेत्याचा अपमान झाल्याचा निषेधही केला.   या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून विरोधकांनी आग्रही मागणी केली. सर्व नगरसेवक महापौरांच्या आसनासमोरील हौदात जमा झाले. 

विरोधकांचा आग्रह लक्षात घेऊन महापौरांनी चर्चेस अनुमती दिली. त्यावर भाऊसाहेब भोईर म्हणाले की, कोणत्या पक्षाचा निषेध नसून राम कदम या व्यक्तीचा निषेध सभागृह करीत आहे. तसेच, आयुक्त हे विरोधी पक्षनेत्याचा अपमान करून संपूर्ण शहराचा अपमान करीत आहेत. सर्व सदस्यांनी पक्ष बाजूला सारून अधिकार्‍यांप्रमाणे एकत्रित यावे. निषेधाच्या ठरावाला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अनुमोदन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षनेते पवार म्हणाले की, नगरसेवकांशी अधिकारी चुकीचे बोलले तर, त्याचा निषेध आहे. मात्र, आयुक्त हर्डीकर हे चांगले अधिकारी आहेत. स्मार्ट सिटी बैठकीत आयुक्त व साने यांचा चर्चेचा मी साक्षीदार आहे. त्या घटनेवर आयुक्तांना विनाकारण ‘टार्गेट’ केले जात आहे. 

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, सदर घटनेबाबत आयुक्तांनी खुलासा करावा. सर्वांना पुढे एकत्रित काम करायचे आहे. विरोधी पक्षनेते साने म्हणाले की, आ. राम कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करीत आहे. तसेच, आयुक्तांनी माझ्याबाबत ते वक्‍तव्य केले त्याचाही निषेध करीत आहे. स्मार्ट सिटी बैठकीत बोलत असताना, एकदम आयुक्तांचा पारा चढला. ते मोठ्या आवाजात व ज्या पद्धतीने बोलले हा अपमान आहे. आयुक्त हे पगारी नोकर असून, नगरसेवक हे विश्‍वस्त आहेत. त्यांनी माफी मागावी.