होमपेज › Pune › समाविष्ट गावांमध्ये निवडणुकीचा आखाडा

समाविष्ट गावांमध्ये निवडणुकीचा आखाडा

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:15AM



पुणे : पांडुरंग सांडभोर

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये लवकरच नगरसेवकपदासाठीचा आखाडा रंगणार आहे. या गावांमध्ये निवडणूक घेण्यासाठी शासकीय पातळीवरही हालचाल सुरू झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेकडून सविस्तर माहिती  मागविली आहे. निवडणुका झाल्यास या गावांना महापालिकेत प्रतिनिधित्व मिळणार आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत गतवर्षी 4 ऑक्टोबरला हद्दीलगतच्या 11 गावांच्या समावेशाची अधिसूचना काढली. ही गावे महापालिकेत येणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने, या गावांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही घेण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे सद्यःस्थितीला या गावांना प्रतिनिधित्वच नाही, त्यातच गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली असल्याने पुढील चार वर्षे या गावांना प्रतिनिधित्व मिळण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 5 चे पोटकलमानुसार या गावांमध्ये नगरसेवकपदासाठी निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असल्याचे समोर आले आहे.

राज्य  निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी याबाबत 27 एप्रिलला  महापालिकेला पत्र पाठविले आहे. त्यात महापालिका अधिनियमातील तरतुदीचा दाखला देत महापालिकेची हद्दवाढ झालेल्या क्षेत्राची निवडणूक घेण्याकरिता त्याची सदस्य (नगरसेवक) संख्या निश्‍चित करण्यासाठी 11 गावांची एकूण लोकसंख्या, त्यात एससी व एसटीची जातीची लोकसंख्या, महापालिकेची मूळ हद्द दाखविणारा आणि हद्दवाढ झाल्यानंतरचा एकत्रित नकाशा अशी काही माहिती तातडीने मागविली आहे. दरम्यान, मागविलेली माहिती पालिकेने वेळेत न दिल्याने, आयोगाने 8 मे रोजी पुन्हा नव्याने पत्र पाठवून ही माहिती सादर करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत.

महापालिकेकडून मागविला खुलासा

अकरा गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पालिका प्रशासनाने या गावांमध्ये निवडणूक घेण्याबाबत सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. मात्र, पालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही, त्यामुळे आयोगाने आता पालिकेकडून त्यावर खुलासा मागविला आहे.

नक्की काय आहे कलम 5 

सार्वत्रिक निवडणुकीनंतर एखाद्या शहराच्या क्षेत्राचा विस्तार करण्यात आल्यास, विस्तारीत क्षेत्राच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, जमेल तितक्या लवकर निवडणूक घेण्यात येईल, अशी तरतूद महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 5 चे पोटकलम 4 मध्ये आहे, त्यानुसार ह्या निवडणुका घेण्याचे नियोजन सुरू आहे.

सदस्य संख्येचे निकष असे

ज्या महापालिकेची लोकसंख्या 24 लाखांपेक्षा अधिक आहे, त्या पालिकेच्या सदस्यांची संख्या 145 इतकी असेल, त्यापुढील प्रत्येक 1 लाख अधिक लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेच्या 2011 च्या लोकसंख्येनुसार सद्यःस्थितीला सदस्यांची संख्या 162 इतकी आहे.

तर दोन नगरसेवक वाढू शकतात

समाविष्ट गावांची एकूण लोकसंख्या अडीच लाख इतकी आहे. त्यानुसार  लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नगरसेवक नव्याने वाढू शकतात, असे पालिकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मात्र, आयोगाने जरी माहिती मागविली असली, तरी निवडणुकीबाबत मात्र संभ्रमावस्था असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. निवडणुकीऐवजी हद्दीलगत आता जे विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांच्याकडेच या वाढीव हद्दीचे प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.