Thu, Jul 18, 2019 16:40होमपेज › Pune › राज्यातून एक हजार टन आंबा निर्यातीचे पणन मंडळाचे उद्दिष्ट

राज्यातून एक हजार टन आंबा निर्यातीचे पणन मंडळाचे उद्दिष्ट

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

राज्य कृषी पणन मंडळाने त्यांच्याकडील निर्यात सुविधांचा उपयोग करून सुमारे एक हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट चालू वर्षी ठेवलेले आहे. मंडळाच्या वाशी येथील व्हेपर हीट ट्रीटमेंट, हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि विकिरण सुविधेचा निर्यातदारांकडून लाभ घेण्यात येत आहे. त्यातून गेल्या तीन महिन्यांत द्राक्ष, गुलाब फुले, डाळिंब, मसाले पदार्थ, पशुखाद्ये, आंबा पल्प, इतर फळे व भाजीपाला मिळून 26.55 कोटी रुपये किमतीचा 2 हजार 761 टन शेतमाल जर्मनी, नेदरलँड, थायलंड, दोहा, बहारीन, अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

राज्यात फळे व भाजीपाल्याचे उत्पादन अधिक होत असून, कृषीमाल निर्यातीकरिता धोरणात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आलेला आहे.   सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनीही तशा सूचना दिलेल्या आहेत. मंडळाने उभारलेल्या निर्यात सुविधा केंद्रांवरून देशांतर्गत विक्रीसाठी मालाचीही हाताळणी केली जाते. त्यामध्ये कांदा, बटाटा, केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू, गुलाब फुले इत्यादी शेतमालाचा समावेश आहे. गेल्या 3 महिन्यांत देशांतर्गत विक्रीसाठी 1 कोटी 88 लाख 11 हजार रुपये किमतीचा 796.10 टन शेतमाल मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आलेला आहे. सुविधा केंद्रांच्या संचालनामुळे रोजगारनिर्मिती होऊन गत तीन महिन्यांमध्ये सुविधा केंद्रावर 412 कुशल व 1505 अकुशल मिळून 1917 जणांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.