होमपेज › Pune › सॅनिटरी नॅपकीनच्या कचर्‍याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल

सॅनिटरी नॅपकीनच्या कचर्‍याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल

Published On: May 05 2018 1:21AM | Last Updated: May 05 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी 

सॅनिटरी नॅपकीनच्या कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘योग्य नियोजन आराखडा ’असण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

सॅनिटरी नॅपकीनचे कचरा व्यवस्थापन व सॅनिटरी नॅपकीन तयार करून विकणार्‍या कंपन्यांनी सॅनिटरी नॅपकीनस्च्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक सॅनिटरी पॅडच्या सोबत वेगळे पाउच द्यावे, असा कायदा असतांना त्याची अंमलबजावणी होत नाही. असा अत्यंत वैज्ञानिक काळसुसंगत मुद्दा मांडणारी पर्यावरणहित याचिका पुर्वा बोरा हिने अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत एनजीटीमध्ये दाखल केली आहे. 

सॅनिटरी नॅपकीन कचरा व्यवस्थापनात भारतभर मोठे बदल घडवून येत आहेत़  मुंबईतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया जन-सोनार व सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत नागपुर उच्च न्यायालयातील वकील स्मिता सिंगलकर या सुद्धा सह-याचिकाकर्त्या आहेत़.

एमपीसीबीने विभागीय अधिकारी नंदकुमार गुरव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे की, सॅनिटरी नॅपकीन उत्पादकांनी सॅनिटरी नॅपकीनस् किंवा डायपर्स उत्पादित करतांना पुन:वापर (रिसायकल) होउ शकेल अशा घटकवस्तुंचा वापर करण्याचे पर्याय शोधण्याची गरज आहे. अन्यथा वापरलेले नॅपकीन किंवा डायपर्स फेकण्यासाठी वेगळे पाउचेस् किंवा रॅपरस् ग्राहकांना नॅपकीन खरेदी करतांनाच द्यावेत असे नमूद केले आहे. 

केंद्रीयपर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संचालक महाराष्ट्र आरोग्य विभाग, मुख्यसचीव शहरी विकासमंत्रालय, पुणे, मुंबई व नागपुरच्या महापालीका आयुक्‍तांना तसेच सॅनिटरी नॅपकीन उत्पादक कंपन्या जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन, युनिचार्म इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, किंमबरले क्लाक्स् लिव्हर लि., प्रॉक्टर अ‍ॅड गॅम्बलर यांनी प्रतिवादी म्हणून दि.19 डिसेंबर 2017 रोजी एनजीटीत हजर राहून याचिकेतून करण्यात आलेल्या आरोपांना प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे आदेश देण्यात आले आहे. असे असताना देखील एमपीसीबीशिवाय इतर कोणीही म्हणणे सादर केले नसल्याची खंत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्‍त केली आहे.