Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Pune › पंतप्रधान आवास योजनेबाबत प्रशासनाची भूमिका संशयास्पद

पंतप्रधान आवास योजनेबाबत प्रशासनाची भूमिका संशयास्पद

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:32AMपिंपरी : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. या संदर्भात सविस्तर आणि समाधानकारक माहिती  दिली जात नाही, असा आरोप करीत स्थायी समिती सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

समितीच्या बुधवारी (दि.29) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. भाजपचे सदस्य विकास डोळस यांनी पंतप्रधान आवास योजनेबाबत सद्यस्थितीची सविस्तर माहिती देण्याची मागणी सभेत केली. या संदर्भात माहिती देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, चर्‍होलीतील गृहप्रकल्पाच्या कामाची वर्कऑर्डर दिली आहे. रावेत येथील गृहप्रकल्प पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. बोर्‍हाडेवाडी प्रकल्पात दुरूस्तीमुळे ‘डीपीआर’ मंजुरीसाठी पुन्हा राज्य व केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

या माहितीवर डोळस यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. मात्र, अधिकार्‍यांनी आणखी माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. पंतप्रधान आवास योजनेवरून अनेक तक्रारी केल्या जात आहेत. विरोधक सत्ताधार्‍यांना ‘टार्गेट’ करीत आहेत. असे असताना पालिका प्रशासनाने या संदर्भात सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. पालिकेचे अधिकारी वेळीच माहिती देत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अधिकार्‍यांची भूमिका शंकास्पद असल्याचा आरोप सदस्यांनी केला. 

पंतप्रधान आवासमधील चर्‍होली, रावेत व बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पाबाबत समाधानकारक उत्तरे दिली जात नसताना आकुर्डी व नेहरूनगर, पिंपरी येथील गृहप्रकल्पाची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य राजू मिसाळ यांनी आक्षेप घेतला. एकीकडे पंतप्रधान आवास योजनेच्या निविदावर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. तर, दुसरीकडे परस्पर नव्या गृहप्रकल्पांचा निविदा प्रसिद्ध करण्यामागे पालिका प्रशासनाच्या काय हेतू आहे,अशी शंका त्यांनी उपस्थित केली. या चर्चेत इतर सदस्यांनीही सहभाग घेतला. दरम्यान, शहरातील 36 हजार 134 एलईडी पथदिवे शासनमान्य कंपनी किती दिवसात बसविणार, करार कोणासोबत करणार, त्या कंपनीवर कोणाचे नियंत्रण राहणार आदी प्रश्‍न सदस्य मिसाळ यांनी उपस्थित केले.  त्यावर सर्वसाधारण सभेतही मुद्दे उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वादग्रस्त पंतप्रधान आवास योजनेच्या आकुर्डी व नेहरूनगरची निविदा प्रसिद्ध

पंतप्रधान आवास योजनेच्या चर्‍होली, रावेत आणि बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पांच्या वाढीव बांधकाम दरावरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर बेछूट आरोप करीत आहेत. या आरोपाचा सामना करता-करता सत्ताधार्‍यांच्या नाकी नऊ झाले आहे. 

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. अशी नकारात्मक परिस्थिती असताना पालिका प्रशासनाने आकुर्डीतील गृहप्रकल्पासाठी 53 कोटी 77 लाख आणि नेहरूनगरातील गृहप्रकल्पासाठी 33 कोटी 65 लाख रूपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा स्वीकारण्यासाठी 28 दिवसांची मुदत दिली आहे. कामाची मुदत अडीच वर्षे आहे.