Sun, Jul 21, 2019 06:27होमपेज › Pune › ‘होर्डिंग्ज’बाबत प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार 

‘होर्डिंग्ज’बाबत प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार 

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:39AMपिंपळे गुरव : प्रज्ञा दिवेकर

नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागातील कृष्णा चौक,काटेपुरम चौक, जिजामाता उद्यान, सृष्टी चौक, पिंपळे गुरव रस्त्यावरची ‘होर्डिंग्ज’ आणि ‘फ्लेक्स’बाजीची गर्दी  दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ताथवडे आणि आळंदी रस्त्यावरील अधिकृत ‘होर्डिंग्ज’ अंगावर पडल्यामुळे अलीकडेच एका महिलेचा आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा “होर्डिंग्ज’पायी  नागरिकांचे किती बळी जाणार आहे, हा कळीचा प्रश्‍न उद्भवत आहे.  तर; दुसरिकडेे वाढत्या ‘होर्डिंग्ज’ आणि ‘फ्लेक्स’मुळे शहरी भागाच्या सौंदर्याला बाधा येत आहे.  त्यामुळे आकाश चिन्ह विभागातील प्रशासनाचा मूक कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

राजकीय वरदहस्तामुळे प्रत्येक रस्त्यावर वाढदिवासीय ‘फ्लेक्स’ मोठ्या प्रमाणात उभारलेले दिसतात तसेच प्रत्येक भागातील मुख्य रस्त्यांवरील चौकात वाढणारी ‘होर्डिंग्ज’ व ‘फ्लेक्स’च्या अतिक्रमणातून व्यवसायिकाना जाहिरातीचा फायदा होत आहे. शहरात ‘होर्डींग्ज’ अथवा ‘फ्लेक्स’ उभे करताना महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाची रितसर परवानगी भरुन त्यांचे शुल्क भरणे गरजेचे असते. तसेच; होर्डींग्जवर तशा प्रकारचा परवान्याचा मजकूरही खाली लावावा लागतो. परंतु; अनेक ‘होर्डींग्ज’ व ‘फ्लेक्स’ परवान्याविनाच लावले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग आणि आकाश चिन्ह परवाना विभागाचे अधिकारी मूक भूमिका घेत आहेत का असा प्रश्‍न पडत आहे.

दै. ‘पुढारी’ ने आकाश चिन्ह परवाना विभाग सहायक आयुक्त विजय खोराटे याच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अधिकृत ‘होर्डिंग्ज’ पडल्यामुळे व्यक्ती मृत पावली आहे. रस्त्यावरील अनधिकृत ‘होर्डिंग्ज’ उभा करणार्‍यांवर नोटिसा दिलेल्या असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सांगून त्यांनी सविस्तर माहिती न देता टोलवा टोलवी केली.

संबंधीतांना ‘होर्डींग्ज’च्या ‘मेन्टेनन्स’ची जबाबदारी देणे गरजेचे

आकाश चिन्ह परवाना विभागाने संबंधीत ‘होर्डींग्ज’ व ‘फ्लेक्स’ लावणार्‍यांकडून परवाना देताना त्या ‘होर्डींग्ज’ अथवा ‘फ्लेक्स’ची देखभाल दुरुस्तीची (मेंटनन्सची) जबादारीही ठराविक कालावधी करता दिली पाहिजे. वर्षानुवर्षे लावलेल्या ‘होर्डिंग्ज’कडे सद्यस्थितित ठेवण्यासाठी उपाय योजनाकडे लक्ष देण्याचं गरज आहे. तसेच अतिक्रमण विभागाने देखील परवाना नसलेल्या ‘होर्डींग्ज’ व ‘फ्लेस’वर कारवाई करण्याची गरज आहे, असे सूज्ञ नागरिकांचे म्हणने आहे.